विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती
विद्या प्रतिष्ठानने तारांगण या युवामहोत्सवाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत उद्या पहिल्यांदाच बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची थेट मुलाखत घेणार आहेत. आत्तापर्यंत शरद पवार यांच्या मुलाखती अनेक मोठ्या नेत्यांनी निवेदकांनी घेतली असेल, मात्र विद्यार्थ्यांनी मुलाखत घेण्याचा हा पहिला योग उद्या (ता्.४) बारामतीत जुळून येतोय.
तारांगण युवामहोत्सवाचे नियोजन हे संस्थेच्या महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची समिती करीत असून त्यांना विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीचे मार्गदर्शन मिळत आहे. शरद पवार यांची विशेष मुलाखत हे विद्यार्थी घेणार आहेत. तारांगण युवा महोत्सवाचे ते प्रमुख आकर्षण आहेत. तारांगण युवा महोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी बारामती,माळेगाव, शारदानगर, सोमेश्वर, भिगवण, इंदापूर, दौड, कळंब, सुपे, पुरंदर आदी भागातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत २० हून अधिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.
तारांगण युवामहोत्सवात ४ मार्च रोजी गदिमा सभागृहात विद्यार्थ्यांद्वारे घेण्यात येणारी शरद पवार यांची विशेष मुलाखत हे तारांगण युवामहोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. तारांगण युवा महोत्सवाचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार,सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांनी बारामती, इंदापूर, दौड, फलटण, पुरंदर आणि जेजुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.