इंदापूर – महान्यूज लाईव्ह
आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंजूर केलेली बाभुळगावची 65 लाखांची पाणी योजना गेली कुठं ? त्या पैशाचं झालं काय ? असा खडा सवाल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच केला आणि सुळे यांच्या गावभेट दौऱ्याच्या सभेत खळबळ उडवून दिली.. गावात योजनांचा बोजवारा उडाला असल्याची भावना कार्यकर्त्याने व्यक्त केली आणि राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांसह स्थानिक पदाधिकारीही शांत बसले..!
पाणी असून आमच्या आयाबहिणींच्या डोक्यावरील हंडा अजूनही उतरला नाही. कार्यकर्त्यानेच थेट खंत व्यक्त केली. यावेळी तेथील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मात्र घाम फुटला..! गंमत म्हणजे स्थानिक सरपंच, माजी सरपंचही या ठि्काणी होते.
ज्याने हा प्रश्न विचारला, तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात आले, मात्र या सभेमुळे एकंदरीतच राष्ट्रवादीची इंदापूर तालुक्यातील ताकद कशी एकमेकांविरोधात वापरली जाते, त्याचाही वरिष्ठ नेत्यादेखत प्रत्यय त्याच जागी आला.
कार्यकर्ते कंत्राटदार झाले की, गावागावात हा प्रकार होतो आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कार्यकर्ता मजबूत करायचा हे धोरण जिथे जिथे वापरले जाते, मात्र ते कार्यकर्ते कामे अशी करतात की, कार्यकर्त्यांचे भले करायला गेलेला नेताच अडचणीत येतो. इंदापूर तालुक्यात सध्या राष्ट्रवादीचा असाच अनुभव लोक घेताहेत.
ज्या कार्यकर्त्यांना रस्त्यांची कंत्राटे दिली, त्यांनी त्या रस्त्याची वाट लावल्याची अनेक उदाहरणे समोर असताना राष्ट्रवादीचे तालुक्यातील नेते येईल तो आपला म्हणत अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांचा विचार न करताच कार्यकर्त्यांना पक्षात प्रवेश देतात आणि उंट तंबूत शिरताना तंबूच फाडून टाकतो याचा अनुभव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत येऊनही राष्ट्रवादी त्यातून काही शिकली नाही असेच बाभुळगावात दिसले.
बाभुळगावात खासदार सुळे यांनी लागलीच गावातील ग्रामसेवकाविषयी विचारणा केली, तर ग्रामसेवक गावात वेळेवर हजर नसतो अशी माहिती उपस्थितांपैकी काहींनी दिली. दुसरीकडे साऱ्या कामांचा पंचनामा होताना राष्ट्रवादीचे नेते त्या बोलणाऱ्या कार्यकर्त्याला गप्प राहण्याचा सल्ला देत होते, मात्र गडी एवढा इरेला पेटला होता की, सारा पंचनामा करूनच तो शांत झाला. या घटनेने मात्र राष्ट्रवादीचंच हसू झालं.
अर्थात यानंतर तरी राष्ट्रवादीकडून त्या ६५ लाखाच्या पाणी योजनेचे काय झाले याचा उलगडा होणार की नाही हा प्रश्न पुढे आला आहे. आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना यात माती कोणी खाल्ली? खाल्ली नसेल, तर ती योजना कशी चालू आहे याचा दाखला द्यावा लागेल, कारण बात बहुत दुरतक गयी है..!
आता फक्त बाभुळगावापुरता हा विषय नाही, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याही प्रतिष्ठेचा हा मुद्दा असून आपण जी कामे मंजूर केली, ती किती कष्टाने केली, याचे प्रत्येक सभेत भरणे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात, त्यामुळे हे सरकारच्या निधीचे पैसे कसे वापरले गेले याचाही खुलासा करण्याशिवाय राष्ट्रवादीपुढे पर्याय नाही.