सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर – काही महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकाऱ्याकडे गांजा पिकविण्याची परवानगी मागितली.. पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथे दोन दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने केलेली अफूची शेती पोलिसांनी उघडकीस आणली.. मात्र शेतीत परवडत नाही, म्हणून उत्पन्न वाढविण्याची इंदापूर तालुक्यातील पळसदेव- माळवाडी- शेलारपट्ट्यातील पाच शेतकऱ्यांचा अफलातून जुगाड या साऱ्यांचा कळस ठरला. त्यांनी तर थेट सामूहिक अफूचीच शेती केली.. बोंडं वर आली, तरीही कोणाला दिसली नाहीत..
पळसदेवनजिकच्या या मक्याच्या शेतात आंतरपिक केलेली अफूची शेती पोलिसांचेही डोळे विस्फारणारी ठरली. आज दुपारपासून पोलिस या ठिकाणच्या पाच शेतकऱ्यांच्या शेतातील अफूच्या शेतीची पाहणी करीत होते.
पळसदेवनजिकच्या शेलारपट्टा परिसरातील पाच शेतकऱ्यांनी सुमारे दीड एकर अफूची शेती केल्याने गुन्हेगारी वर्तुळातही मोठी चर्चा सुरू आहे. जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे या वरिष्ठांनीही या ठिकाणी भेट दिली.
या परिसरात मक्याचे पिक करून चार बाजूला मका व आतमध्ये अफूची शेती शेतकऱ्यांनी केल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये कोणी एकच शेतकरी नाही, जवळपास पाच शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात असले भन्नाट जुगाड केले आहे. ज्याचा पश्चाताप आता पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना होईल.
यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून अद्याप अधिकृत माहिती नाही, माहिती घेण्याचे काम सुरू असून रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती उद्या जाहीर केली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे या पिकाच्या माध्यमातून या पाच जणांनी नेमके किती पैसे कमवायचे ठरवले होते हेही लवकरच उघड होईल.