सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर -गेल्या सहा ते सात वर्षापासून अवसरी – वडापुरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. शाळकरी मुले, वृद्ध, शेतकरी या सर्वांची मोठी रहदारी या रस्त्यावरुन होत आहे. हा रस्ता जाणीवपूर्वक दुरुस्त केला नसल्याचे सांगत आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर भाजपाने निशाणा साधला आहे.
खड्डेमय रस्त्याला यामुळेच “झेंडू बाम” रस्ता म्हणून ओळखला जात असल्याचे सांगत आज या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नियोजित दौऱ्यात खुद्द सुप्रिया सुळे यांनी या रस्त्यावरून जाऊन पाहणी करावी,असा सल्ला देत भारतीय जनता पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी झेंडू बाम रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.. आता खासदार सुळे या जामदार यांच्या रस्त्याच्या प्रश्नावर खरंच गांभीर्याने घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे..
भारतीय जनता पार्टीची बारामती लोकसभा मतदारसंघात ताकद वाढत चालली असल्यामुळे आता पवारांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे, त्यामुळेच कधी नव्हे ते आता अलिकडेच त्यांचे इंदापूर तालुक्यात दौरे वाढलेले आहेत, असा खरमरीत टोला भाजपाचे इंदापूर तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी लगावला आहे.
आज खासदार सुप्रिया सुळे यांचा इंदापूर तालुक्यात नियोजित दौरा आहे.त्यापैकी वडापुरी गटात दौरा आहे.ॲड.जामदार म्हणाले की, वडापुरी अवसरी हा रस्ता ज्याला गावकऱ्यांनी झेंडू बाम रस्ता असं नाव दिले आहे त्या रस्त्यानेही सुळे यांनी जावे म्हणजे विकास काय झाला आहे हे तुम्हाला समजेल.
गेल्या सहा ते सात वर्षापासून अवसरी वडापुरी रस्ता हा “झेंडू बाम” रस्ता म्हणून ओळखला जातो कारण या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने तेथील नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. शाळकरी मुले, वृद्ध, शेतकरी या सर्वांची आवकजावक या रस्त्याने मोठ्या प्रमाणात आहे. तरीही जाणीवपूर्वक हा रस्ता दुरुस्त केला गेला नाही असा आरोप शरद जामदार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर केला.
अवसरी-वडापुरी रस्त्याने जाण्याचा असा सल्ला ॲड. शरद जामदार यांनी खा.सुप्रिया सुळे यांना दिल्याने आता यांनी अवसरी वडापुरी रस्त्याबाबतच्या तक्रारीवर खरंच सुप्रिया सुळे या रस्त्याची पाहणी करणार का? ‘झेंडू बाम’ या रस्त्याबाबत त्या काय बोलणार याकडे तेथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.