पुणे – महान्यूज लाईव्ह
सातारा- पुणे महामार्गावर बुधवारी मध्यरात्री झालेला अपघात दोघांसाठी जीवघेणा, तर पाच जणांच्या कुटुंबांसाठी खर्चिक ठरला. ट्रक व कारच्या धडकेत शिरूरमधील दोघांना आपला जीव गमवावा लागला.
पारगाव येथे महामार्गावर ही घटना घडली. खंडाळा येथील एका दवाखान्यात या अपघातातील पाच जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात घडला.
पारगाव येथील रस्त्यालगतच्या चहाच्या टपरीवरचा चहा पिण्यासाठी अनेक वाहने थांबलेली होती. त्याच मार्गाने निघालेल्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले.
यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील महिला व १५ वर्षाच्या मुलाचा यामध्ये समावेश असून या घटनेत इतरही पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर तिथे धावपळ उडाली. जखमींना नजिकच्या खंडाळ्यातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.