बारामती : महान्यूज लाईव्ह
येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता महाविद्यालयीन स्पर्धा 2022-23 मध्ये पुणे विभागातील उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने
सन्मानित करण्यात आले.
महाविद्यालयाचे सन्मवयक डॉ. सुनिल ओगले यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय समन्वयक व उत्कृष्ट विभागीय समन्वयक अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या करियरला योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने करियर कट्टा हा उपक्रम राबविला जातो. त्या अंतर्गत केलेल्या कामगिरीबद्दल या विविध पुरस्काराने महाविद्यालयास गौरवण्यात आले.
उत्कृष्ट काम करण्या-या समन्वयक, प्राचार्य व महाविद्यालयांना के. जे सोमय्या विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय विद्याविहार मुंबई येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उद्योजकता व कौशल्य विकास विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले, पॉवर सेक्टर स्किल कौन्सिल, नवी दिल्ली येथील सचिव प्रफुल्ल पाठक, करियर कट्टाचे अध्यक्ष संचालक यशवंत शितोळे, सोमैय्या विद्याविहार विद्यापीठाचे कुलगुरू डॉ राजशेखर पिल्ले, संस्थेचे सचिव लेफ्टनंट जनरल जगबीर सिंग उपस्थित होते.
विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून मागील चार वर्षात ७० विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने सेंटर ऑफ एक्सलन्स साठी करिअर कट्टा कडुन दहा लाख रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्याचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राचार्य डॉ. भरत शिंदे व डॉ. सुनिल ओगले यांच्यासह उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, डॉ राजाराम चौधर, डॉ राजेंद्र खैरनार, डॉ आनंदा गांगुर्डे, डॉ श्रीराम गडकर यांनी स्विकारला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भरत शिंदे यांचे विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सौ सुनेत्रा पवार तसेच संचालक मंडळाच्या सर्वं सदस्यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाला नुकतेच पुणे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.