दोन वर्षांपासून बंद असलेली बस सेवा सुरू करण्यात युवासेनेला यश
बारामती – महान्यूज लाईव्ह
कोरोना काळापासून बंद असलेली आसू -बारामती शटल सेवा पूर्ववत सुरू करण्यात बारामतीच्या युवासेनेला यश आले. ही बससेवा गेली दोन वर्षे बंद होती. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
बारामती ते फलटण तालुक्यातील आसू या गावी बारामती -आसू अशी शटल सेवा सुरू होती, परंतु कोरोना काळापासून ही बस सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत होते.
या बससेवेच्या बंद सेवेमुळे विद्यार्थ्यांना आसू वरून चार किलोमीटर पायपीट करत तावशीला यावे लागत होते, अशा परिस्थितीत युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल देवकाते यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.
पुण्याचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर युवासेनेच्या प्रयत्नांना यश आले. यानंतर अखेर दोन वर्षानंतर आसू, पवारवाडी, गोखळी, मेखळी, जांभळी फाटा, डोरलेवाडीपाटी, दत्तमंदिर या थांब्यांवरील विद्यार्थी आणि इतर प्रवाशांनी आसू बस सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान या यशानंतर माजी मंत्री विजय शिवतारे व जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाज हिताची कामे करणार असल्याचे युवासेना प्रमुख अमोल देवकाते यांनी सांगितले. या सर्व कार्यवाहीत पवारवाडीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर पवार व आसूचे डॉ. सोमनाथ गोडसे यांचेही मोलाचे सहकार्य लाभल्याचे देवकाते यांनी सांगितले.