कांदा व इतर पिकांना भाव न मिळणाऱ्या पिकांमध्ये रोटर फिरवण्यास अनुदान मिळणेबाबत जामखेडच्या शुभम वाघ यांनी राष्ट्रपतींना थेट लिहिलं पत्र..
नगर : महान्यूज लाईव्ह
एकीकडे अर्धा टन कांद्याला दोन रुपये तर 100 किलो वांग्याला एक रुपया अशी दयनीय अवस्था असल्याने कोबीपासून कांद्यापर्यंत शेतकरी पिके उपटू लागले आहेत किंवा त्यावर नांगर फिरवत आहेत. रोटर फिरवत आहेत. सरकारने 2022 मध्ये दुप्पट उत्पन्न होण्याची हमी दिली होती, त्या हमीचे तीन तेरा वाजले आहेत.
किमान आता उभी पिके नांगरण्यासाठी रोटरला तरी अनुदान द्या अशी अजब मागणी जामखेड मधील शुभम वाघ या शेतकऱ्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे.हे पत्र सध्या व्हायरल होत असून शेतकरी किती हातबल आहेत याची त्यातून प्रचिती येत आहे. दरम्यान शुभम वाघ या शेतकऱ्याने राष्ट्रपतींना दिलेले पत्र जसेच्या तसे…
महोदया, आज शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला काही दर मिळत नसल्याने उभ्या पिकात रोटर फिरवावा लागत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजारात चेष्टा केल्याप्रमाणे 500 ते 600 किलो कांदा विकून फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळतेय. कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. कोबी, फ्लॉवर, कांदा आणि मोठा खर्च करून केलेली केळीच्या बागेतही रोटर फिवरण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे.
एकीकडे महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. पण खर्चाच्या निम्म्या रकमे इतकाही नफा शेतकऱ्यांना मिळत नाहीये. तसेच शेतमाल निर्यात होत नसल्याने बाजारात आवक वाढतेय. त्यामुळे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला कवडीचाही दर मिळत नाहीये. आता शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. कुठलही पीक केलं तरी तिचं अवस्था निर्माण होतेय. पण त्याच्याकडे दुसरा पर्याय तरी आहे का? म्हणूनच माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी 2000 ते 2500 रुपये लागतात. जिथे मोठ्या आशेने लावलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळत असल्याने त्या पिकात आज शेतकरी रोटर फिरवत आहे. जिथं शेतमालचं विकला नाही, तर तिथं शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागतेय. शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही.
आज शेतकऱ्यांना 2 रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळतेय, पण तोच कांदा बाजारात सामन्यांना 20 रुपये किलोने विकला जातोय. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होतेय? शेतकरी राजाने फक्त काबाड कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे. आधीच लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळतोय. म्हणूनच निदान भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर 2 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे, ही कळकळीची विनंती आहे. आपला विश्वासू, शुभम गुलाबराव वाघ