दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) हद्दीतील शेतरस्त्यावर वाहनाचे शेड उभारून अडचण निर्माण केल्याप्रकरणी महामंडळाच्या अधिका-यांनी मंगळवारी पोलीस बंदोबस्तात मंडळाची हद्द कायम केली. महामंडळाचे स्थापत्य अभियंता लहू कसबे, विभाग व्यवस्थापक सौ भोसले, आरेखक उमेश कोष्टी, शाखा अभियंता संदीप पवार, पोलीस निरिक्षक बाळासाहेब भरणे, कृष्णदेव पवार यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.
वाई एमआयडीसीतील गंगापुरी- शेलारवाडी रस्त्यालगत असलेल्या प्लाँट नं. 28/3 च्या दक्षिण बाजूने ४ मीटर संपादित रस्त्यावर अंबिके कुटुंबाने वाहनासाठी शेड, गवताची गंजी, दगड ठेवून एमआयडीसीची जागा घरगुती वापरासाठी आपल्या ताब्यात ठेवली होती. त्यामुळे महामंडळाने शेतक-यांसाठी ठेवलेल्या रस्त्यात अंबिके कुटुंबाने अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले होते. वस्तुस्थिती माहीत असूनही जागा खाली करण्यास अंबिके कुटुंबिय टाळाटाळ करीत होते.
याबाबत महामंडळाच्या अधिका-यांनी वारंवार अंबिके कुटुंबाला जागा खाली करणेबाबत लेखी व तोंडी सूचना केल्या होत्या. मात्र ते राजकीय पुढा-यांचा वरदहस्त वापरून अधिका-यांना काम करू देत नव्हते. 2009 साली अधिका-यांनी एमआयडीसीची जागा दाखवूनही अंबिके कुटुंबिय सामुहिक गुंडगिरी व बाहेरील गुंडाचा वापर करून शेतक-यांना नाहक त्रास देत होते. बाजूला आपली मोकळी जागा असूनही एमआयडीसीच्या जागेत साहित्य टाकणे, त्या जागेत वृक्षारोपण करणे अशी कृत्ये अंबिके कुटुंबिय जाणूनबूजून करीत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी लेखी स्वरूपात अधिका-यांकडे केल्या होत्या.
कोरोनानंतर जानेवारी 2022 मध्ये शेतक-यांनी ही बाब महामंडळाच्या अधिका-यांच्या लक्षात आणून दिली होती. संबंधितांना तीन-चार नोटीसा अधिका-यांनी दिल्या. तरीही गेल्या दोन वर्षांत संबंधितांनी जागा मोकळी करून दिली नव्हती. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी अधिका-यांनी संबंधितांना अंतिम नोटीस दिली व मंगळवारी कारवाईस सुरूवात केली. मात्र अंबिके कुटुंबाने सोमवारी गुपचूपपणे वाहनाचे शेड काढून घेतले. गंज व दगडी बाजूला केल्या आणि अतिक्रमण नसल्याचा व यापुढे रस्ता नसल्याचा कांगावा सुरू केला.
मात्र मंगळवारी अधिका-या़ंनी अंबिके कुटुंबाचे म्हणणे ऐकून घेऊन पोलिसांच्या मदतीने महामंडळाची जागा ताब्यात घेतली व तक्रारदार शेतक-यांच्या समक्ष संबंधितांना महामंडळाची हद्द दाखवून दिली. त्यानुसार पांढरी रेषा ओढून शेतक-यांना जागा मोकळी करून दिली.
मात्र सदर रस्त्यावर झाडे लावलेली असल्यामुळे वाहने जाण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. लवकरच हा रस्ता मोकळा करून देण्यात येईल, असे महामंडळाच्या अधिका-यांनी सांगितले. यावेळी तक्रारदार पेटकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. अधिका-यांनी केलेल्या कामाबद्दल परिसरांतील शेतक-यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.