बारामती : महान्यूज लाईव्ह
पुणे जिल्ह्यातील भोर व पुरंदर तालुक्यातील महावितरण कंपनीचे विद्युत रोहीत्रे फोडून त्यामधील तेल बाहेर फेकून तांब्याच्या तारा बाहेर काढून चोरी करणारी अट्टल टोळी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.
इमामउद्दीन शाहाबुद्दीन खान ( वय २४) जावेद हदीस खान (वय ३१) सतराम रामदुलारे चौहाण (वय २४) शफिकअहमद अब्दुलरहीम खान (वय ३३, सर्व राहणार तुलसीपूर जिल्हा बलरामपूर राज्य उत्तर प्रदेश, सध्या सर्व राहणार नहे आंबेगाव पुणे) अशी या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जिल्ह्यातील भोर व पुरंदर तालुक्यात अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे रोहीत्र व साहित्याची चोरी केली जात होती. परिणामी या परिसरात विजेचा पुरवठा खंडित होऊन त्याचा त्रास नागरिक व शेतकऱ्यांना होत होता.
सदरचे गुन्हे उघड करण्याकरता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, दत्तात्रय तांबे,विजय कांचन, मुकुंद कदम, अजित भुजबळ, पोलीस शिपाई धीरज जाधव, समाधान नाईकनवरे व अमोल शेडगे यांचे पथक तयार केले.
या पथकाने तपासाची सूत्रे हातात घेताच रोहीत्रे चोरणारी अट्टल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्याची कामगिरी केली. या पथकाला गोपनीय बातमीदाराच्या माहिती मिळाली आणि अब्दुल रहमान खान हा भंगारवाला त्याच्या साथीदाराच्या मदतीने विद्युत रोहीत्रे फोडून त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करत असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार या पथकाने अब्दुल रहमान खान याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे मित्र व कामगारांच्या मदतीने विद्युत रोहीत्रे व त्यामधील तांब्याच्या तारा चोरी करीत असल्याचे कबुली दिली. या आरोपींनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील चोरी गेलेल्या विद्युत रोहित्रांची स्वतंत्रपणे सखोल चौकशी केली.
यामध्ये त्यांनी जिल्ह्यातील १४ ठिकाणी व सातारा जिल्ह्यात २२ ठिकाणी अशा वेगवेगळ्या एकूण ३६ ठिकाणी ४१ विद्युत रोहीत्रे व त्यामधील तांब्याच्या तारा चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. सर्व आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपास कामासाठी सासवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.