दौंड तालुक्यातील मलठण येथील प्रकार!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील मलठण येथील गुरूदेव दादाजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयातील ८ वीच्या मुलीला घरून शाळेत एकटी पायी चालत जात असताना रस्त्यावर मध्येच अडवून, तिचा हात धरून, माझं तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणूत प्रपोज केले. या प्रकरणी एकावर दौंड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. नवनाथ अकुंश विरकर (रा. मलठण ता.दौंड जि पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,गुरूदेव दादाजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ८ वीत शिकणारी मुलगी गुरुवारी ( दि.१६) रोजी घरुन शाळेत जात असताना अकरा वाजण्याच्या आसपास नवनाथ अकुंश विरकर या मुलाने तिचा पाठलाग केला.
तिला रस्त्यावर अडवून तिचा हात हातात घेवून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणला. घडलेला प्रकार त्या मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितला. मात्र, मुलीची व आपली बदनामी होईल या भितीने त्यांनी घडलेला प्रकार कोणाला सांगितला नाही व पोलिस स्टेशनला येवून तक्रार दिली नाही.
मात्र त्यानंतर मंगळवारी (दि २८) रोजी दुपारी ११.३० ते १.४५ वाजण्याच्या दरम्यान मुलगी ही तिच्या शाळेत वर्गात असताना तिच्या वर्गातील वर्गमैत्रिणीने तिच्या बेंचजवळ येवून तिला एक मोबाईल फोन दिला व सांगितले की, तुला हा मोबाईल नवनाथ विरकर याने दिला असून तुला फोन करायला लावला आहे. हा प्रकारही मुलीने घरी आल्यानतंर आई वडिलांना सांगितला.
त्यानंतर मात्र मुलीच्या वडिलांनी दौंड पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. वडिलांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत त्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सध्या शाळेत व महाविद्यालयामध्ये अल्पवयीन मुलींना मोबाईल, पैसे व इतर आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यांच्यावर जबरदस्तीने प्रेमासाठी प्रपोज केले जात आहे.
शाळेच्या आवारात शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर रोड रोमिओंचा मोकाट वावर असतो. शाळेत ये जा करणाऱ्या मुलींना छेडछाड करणे व पाठलाग करणे व प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलींना पळवून नेणे असे प्रकार दिवसेंदिवस घडत आहेत. सुरवातीला भीतीपोटी मुली आपल्या आई-वडिलांना घरी काही सांगत नाहीत. मात्र मुलींनीही असे प्रकार घडत असतील तर आई-वडिलांना व नातेवाईकांना विश्वासात घेऊन घडलेले प्रकार धाडसाने सांगावेत व पालकांनीही आपल्या मुलांवर व मुलींवर शाळेत जाताना येताना लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.