राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड: दौंड तालुक्यातील राजकीय व्यक्तींच्या बेकायदा व बोगस शिक्षण संस्थांवर धडक अशी कारवाई करुन कुलूप ठोकणारे दौंडचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी तथा वरिष्ठ जिल्हा शिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी नुकतीच केडगाव येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर धाड टाकून दोन विद्यार्थ्यांसह नऊ शिक्षकांवर कॉफी पुरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करत मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईचा दौंड तालुक्यातील शिक्षण संस्था चालकांनी पुन्हा एकदा धसका घेतला असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दौंड तालुक्यातील राजकीय वरदहस्ताने चालणाऱ्या शिक्षण संस्थांनी शिक्षण क्षेत्रात पैशाचा बाजार मांडला आहे. विद्यार्थ्यांकडून मनमानी प्रवेश फी व परीक्षा फी आकारली जात आहे.
बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाची ही दिशाभूल व फसवणूक केली जात आहे. अशांवर दौंडचे तात्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी कुलुप ठोकून दंडात्मक कारवाई केली होती. राजकीय व्यक्तींच्या आशिर्वादाने चाललेल्या शाळेवरच कारवाई केल्यामुळे राजकीय दबावतंत्राचा वापर करत भुजबळ यांची पुण्यात बदली झाली.
मात्र जिल्हा शिक्षण अधिकारी किसन भुजबळ यांनी दौंड तालुक्यातील राजकीय शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी केल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांसह नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल करत मोठी कारवाई करत पुन्हा शिक्षणचालकांना दणका दिला आहे.
सोमवारी (दि.२७) जिल्हा गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ व दौंड तालुका गटशिक्षणाधिकारी बी.एन. कळमकर यांच्या भरारी पथकाने तालुक्यातील केडगाव येथील विद्यालयातील शिक्षकांवर सामुहिक कॉफी प्रकरणी ही कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे.
केडगाव येथील जवाहर विद्यालय व उच्च विद्यालय ची कारवाई झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आणि आपली बदनामी झाल्याचा आव आणत शिक्षण संस्थाचालकांनी आमच्या कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर असा प्रकार घडलाच नाही असा दावा करीत झालेल्या प्रकारावर पडदा झाकण्याचे काम सुरू केले आहे.
मात्र परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना केंद्रप्रमुख व शिक्षक यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही या ठिकाणी येण्याची परवानगी नाही. असे असताना जवाहर विद्यालयातील संस्थेचे अध्यक्ष हे परिक्षा सुरू असताना केंद्रप्रमुख संचालकांच्या रूम मध्ये जिथे बारावीचे पेपर विद्यार्थ्यांना देण्यासाठी फोडले जातात त्या ठिकाणी दिवसभर बसून का होते ? त्यांना ही परवानगी कोणी दिली ?
जर विद्यार्थ्यांची या परिक्षा केंद्रावर अंग झडती घेऊन परीक्षेसाठी बसवले गेले तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉफी आली कुठून ? असा प्रश्न जिल्हा शिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी उपस्थित केला असून या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हे घडलेल्या प्रकारावर बचतत्माक भूमिका घेत आहेत.
दरम्यान, या करावाईचा दौंडमधील शिक्षण संस्था व परीक्षा केंद्र चालकांनी नव्हे तर जिल्ह्यातील शिक्षण संस्था व परीक्षा केंद्र चालकांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक राजकीय शिक्षण संस्था चालकांनी आता परीक्षा केंद्रावर कागदाचा साधा एक तुकडा ही दिसता कामा नये अशी तंबी केंद्रप्रमुख व शिक्षकांना दिले असल्याचे चित्र आहे.
परीक्षा केंद्रावर गेटवरच विद्यार्थ्यांची काळजीपूर्वक तपासणी करून त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कॉफी नसल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोडावे असे सक्त ताकीद दिली आहे. दरम्यान, जिल्हा शिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी दौंड तालुक्यातील बारावीच्या परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉफी प्रकरणी शिक्षकांवर केलेल्या कारवाईचे पालकांनी व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.