धाराशिव – महान्यूज लाईव्ह
कोर्टातील कामकाजासाठी आलेल्या माजी मंत्री व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची एका आजोबांनी अशी जिरवली की, विचारायची सोयच नाही. एरवी प्रशासनापासून राज्य सरकारला खडे बोल सुनावणाऱ्या कडूंना काढता पाय घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.
धाराशिव येथील ८० वर्षीय शेतकरी अर्जून घोगरे यांनी थेट कडूंना घेरले आणि पाठीमागील वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना हाक मारून मिडीयावाले बघा.. गद्दारांचा बाप असे म्हणत कडूंना सुनावण्यास सुरवात केली.
कडूंचा एक कार्यकर्ता या आजोबांना तुमची नेमकी काय अडचण आहे असे विचारू लागला तर हीच खरी अडचण असल्याचे सांगत कडूंकडे इशारा केला. त्यावर कार्यकर्त्याने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, तुम्ही गद्दारी का केली? हा गद्दाराचा बाप आहे, डाकूसोबत गेला, घटना टिकवा, येड्यावानी करू नका असा वडीलकीचा सल्ला देत त्यांनी कडूंना धारेवर धरले.
कडूंचे कार्यकर्ते आजोबांना काही बोलण्याच्या तयारीत असताना कडूंनी त्यांना गप्प केले आणि काहीही न बोलता ते गाडीत बसले, मात्र गाडीत बसल्यावर गाडीच्या बोनेटसमोर जात घोगरे यांनी गाडी अडवून धरण्याचा प्रयत्न केला, मग मात्र कार्यकर्ते व पोलिसांनी घोगरे यांना बाजूला घेतले.
पत्रकारांशी बोलताना घोगरे यांनी आपला संताप व्यक्त केला, ते म्हणाले, बच्चू कडूंना ज्या आशेने निवडून दिले, तसे ते वागत नाहीत. ते महाडाकूंसोबत गेले आहेत, जनतेला त्यामुळे त्रास होतो आहे असे त्यांनी सुनावले.