सुरेश मिसाळ -महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे गावागावात सुप्त संताप आहे. आता तर ज्यांनी या रस्त्याला परवानगी दिली, त्याच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावत लासुर्णे गावात ठेकेदार व प्रशासनाने पुन्हा उड्डाणपूलाचा घाट घातला आहे, त्याविरोधात पृथ्वीराज जाचक यांनी थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
लासुर्णे गावातील प्रश्न पेटला, तर त्याचे परिणाम छत्रपती कारखान्यासमोरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर रस्त्याच्या वाढवलेल्या उंचीवरही होणार आहे. तेथेही राजकीय संघर्ष होऊ शकतो. त्याचप्रमाणे निमगाव केतकीत अजूनही हा वाद सुरूच आहे. आता लासुर्णे गावात चक्क राज्य साखऱ संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचकच उपोषणाला बसणार आहेत.
इंदापूर- बारामती मार्गावरील लासुर्णे येथे उड्डाणपूल नियोजित असल्याची माहिती मिळाल्यानंतर जाचक यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमवेत नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन व आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यासमवेत पंढरपूर येथे जाऊन गडकरी यांची भेट घेतली होती.
केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गावर लासुर्णे गावातून उड्डाणपूल नको ही गावकऱ्यांनी केलेली मागणी लक्षात घेत संबंधितांना सूचना दिल्या होत्या व उड्डाणपूल नको असल्यास तेथे उड्डाणपूलाची आवश्यकता काय असाही प्रश्न केला होता.
त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनीही गावच्या सरपंच, उपसरपंचांसमवेत चर्चा केली. गावकऱ्यांनी उड्डाणपूल नको अशी मागणी केली, मात्र तरीही उड्डाणपूलाचा घाट घातला जात असल्याने जाचक संतापले आहेत. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा जाचक यांना संशय असून त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती कारखान्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उंची वाढवलेला रस्ता पाहून आक्रमक पवित्रा घेतला होता हा रस्ता होऊ देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर हा रस्ता तिथेच थांबला. आता लासुर्ण्यातील उड्डाणपूल रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा पवित्रा जाचक यांनी घेतला आहे.