सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूरच्या तहसील कार्यालयासह शहरातील जनतेच्या हृदयात आपुलकीचे स्थान निर्माण करणारे संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे तसेच पुण्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत असणारे सुनील संपतराव जगताप (वय ५० रा. सावतामाळीनगर, इंदापूर) यांचे आज (मंगळवार) दुपारच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
जगताप यांच्या पश्चात आई पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, भावजय असा परिवार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुनील जगताप यांचे आज इंदापुरात काम असल्याने ते सकाळी इंदापूर तहसील कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयात कामानिमित्त आले होते.
यावेळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना चक्कर आली. याची माहिती मिळताच तहसील कार्यालया त आलेले त्यांचे बंधू यांनी सुनील यास तात्काळ शहरातील डॉ. पाणबुडे हॉस्पिटलमध्ये नेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी सुनील यास अकलूज येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये नेत असताना उपचारापुर्वीच त्यांचे निधन झाले.
पुण्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत असणारे सुनील जगताप यांनी इंदापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सन 2002 पासून संगणक ऑपरेटर म्हणून यशस्वीरीत्या काम पाहिले. बरीच वर्षे त्यांनी इंदापूर मध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम केले आहे.अतिशय संयमी व मितभाषी व सर्वांशी आदराने, प्रेमाने, आपुलकीने वागणारे सुनील जगताप यांच्या जाण्याने संबंध शहरांत व तहसील कार्यालयात हळहळ व्यक्त होत होती.
शेतजमीन किंवा गुंठेवारी खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या प्रत्येकाशी अतिशय सलोख्याने, प्रेमाने वागणारे व प्रत्येकाचे काम वेळेत होईल याची दक्षता घेणारे सुनील जगताप यांच्या जाण्याने त्यांचा इंदापूर पंचक्रोशीत असणाऱ्या मोठ्या मित्र परिवाराला प्रचंड धक्का बसला आहे. व शहरातील अनेकांना दुय्यम निबंधक कार्यालयात सहकार्य केल्याने सर्वांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आदराचे स्थान निर्माण झाले होते.
अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी परिस्थितीशी दोन हात करून आपले प्रापंचिक व समाजातील स्थान मजबूत केले होते. आज सायंकाळी खंडोबाच्या माळावर असणाऱ्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.