सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विजेच्या तारा कधी किती नुकसानकारक ठरतील हे सांगता येत नाही. आज इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी भागात घडलेल्या या घटनेने याचा थरार प्रत्ययास आणून दिला.
याचा व्हिडिओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेजवर पाहू शकता..
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीतील जाधववाडी भागात ही घटना आज घडली. राऊतवाडी येथून अण्णासाहेब पाटील यांचा ट्रॅक्टर उसाचे पाचट ट्रॉलीमध्ये भरून निमगावकेतकी कडे निघाला होता. मात्र वाटेतच जाधववाडी परिसरात ही घटना घडली.
उसाचे पाचट घेऊन निघालेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा वीजेच्या खांबाच्या तारेला स्पर्श झाला. त्यातून अचानक थेट आग लागली. काही कळण्याच्या आत पाचटाने पेट घेतला आणि पाठोपाठ ट्रॉलीतून ट्रॅक्टर बाहेर काढण्याचीही फुरसत मिळाली नाही.
एवढेच नाही, तर ही घटना एवढी वेगाने घडली की, ट्रॅक्टरचालक देखील या घटनेत किरकोळ प्रमाणात भाजला.
या आगीत ट्रॅक्टर पूर्ण जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले असून ट्रॅक्टरचालकाला इंदापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान लागलेली आग एवढी मोठी होती की परिसरात आगीचे लोट पसरले होते.