पुणे – महान्यूज लाईव्ह
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अगदी हाय व्होल्टेज अशीच होती.. अगदी मतदान झाल्यानंतरही उपोषणापर्यंत व महिलांना मारहाण करेपर्यंतच्या अनेक घडामोडी या मतदारसंघात घडल्या… यातून उमेदवार आता कुठे उसंत घेताहेत, तोच कार्यकर्त्यांनी अतिउत्साहात रवींद्र धंगेकर व हेमंत रासने यांचे विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचे फलकही लावून टाकलेत..!
कधीकधी समर्थकांचा अतिउत्साह कसा अंगावर येतो याचा अनुभव सध्या कसबा विधानसभा मतदारसंघातील धंगेकर व रासने दोघेही घेत असावेत. कारण यांनी पुढे जाण्यापेक्षा कार्यकर्त्यांनीच एवढी पावले पुढे टाकलेली होती की, कोणालाच कशातून माघार घेता येत नव्हती.
आता हेच बघा ना.. कॉन्फीडन्स नावाची चीज एवढी भयानक सुंदर असते की, कोणाची कधी माती करेल याचा नेम नाही. दोन दिवसांनी मतदानाचा निकाल मतदान यंत्रे दाखवतील, तोपर्यंतही कार्यकर्त्यांना दम नाही.
कार्यकर्त्यांनी आजच कसब्यात धंगेकर हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल भलामोठा फ्लेक्स फलक पुलाच्या खाली लावला.. मग भाजपचे समर्थक कसे गप्प बसतील? एका श्रीराम भक्तानेही लागलीच रासने हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदनाचा फलकही लावला. आता ज्या्ंनी मतदान केले आहे, ते बिचारे या फलकाकडे मान वळवून वळवून पाहत ये-जा करीत आहेत…त्यांच्या मताला काही किंमत आहे की नाही राव? एवढा कॉन्फीडन्स होता तर, मग निवडणूकीचा अर्ज भरण्यापूर्वीच करायचे ना अभिनंदन?