राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात महावितरण वीज कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी यांच्या थकीत वीजबिल भरण्यावरून आणि वीजतोड भूमिकेविरोधात आमने-सामने संघर्ष सातत्याने पहायला मिळत आहे. मात्र, महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाटस येथील दिव्यांग व्यक्ती कैलास शरद खंडाळे यांचे तब्बल ११ हजार ५३० रुपये थकीत वीज बिल आणि सेक्युरिटी डिपॉझिट व रिकनेक्शन चार्जेस भरले.
विज बिल भरण्याची आर्थिक परिस्थिती नसलेल्या एका दिव्यांग व्यक्तीचे थकीत विज बिल भरुन महावितरणच्या या अधिकाऱ्यांनी माणुसकीचे एक नवीन दर्शन घडवले आहे. याबद्दल या अधिकाऱ्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
पाटस येथील कैलास अशरद खंडाळे यांचे घरगुती वीज बिल १५ हजार ५३० रुपये थकीत होते. थकीत बिल जमा न केल्याने महावितरण वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे घरगुती वीज जोड तोडून वीज पुरवठा बंद केला होता.
त्यामुळे खंडाळे यांनी १३ फेब्रुवारी रोजी १५ हजार ५३० रुपये थकीत बिला पैकी ४ हजार रुपये विजबिल जमा केले. मात्र उर्वरित थकीत बिल भरण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने खंडाळे यांनी महावितरण वीज कंपनीला पत्रव्यहार करीत मी शारीरिक अपंग असून मी बेरोजगार आहे. माझ्यावर दोन मुलींच्या शिक्षणाचा खर्च आहे तोही खर्चही भागत नाही. त्यामुळे विज बिल भरण्याची माझी आर्थिक परिस्थिती नसल्याने ते मी भरू शकत नाही.
वीज नसल्याने मुलींना अभ्यास करता येत नसून त्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत चा पत्रव्यवहार महावितरण कंपनीकडे केला. हे पत्र दौंड महावितरण वीज कंपनीचे वरिष्ठ अभियंता महेश धाडवे यांनी केडगाव – दापोडी येथील महावितरण वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडगे यांच्याकडे पाठवले.
येडगे यांनी या अर्जाची वस्तुस्थिती ची माहिती जाणून घेतली. त्यानंतर लगेच त्यांनी उर्वरित थकित वीज बील ११ हजार ५३० रुपये स्वतःच्या खिशातून महावितरण च्या खात्यात जमा करून खंडाळे यांचे थकीत असलेले वीज बिल जमा केले आणि त्याची पोचपावती दौंड महावितरण च्या कार्यालयातील अभियंता महेश धाडवे यांच्याकडे पाठवली.
धाडवे यांनीही उर्वरित सेक्युरिटी डिपॉझिट व रिकनेक्शन चार्जेस भरले. खंडाळे यांची तोडण्यात आलेली वीज जोड त्वरित जोडून त्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा आदेश त्यांनी वीज कर्मचाऱ्यांना दिले आहेत. दौंड महावितरणच्या वरिष्ठ कार्यकारी अभियंता राजेंद्र येडगे आणि अभियंता महेश धाडवे यांनी दाखवलेल्या तत्परता व कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. दौंड प्रहार संघटनेने महावितरणच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत आभार मानले आहेत.