मुंबई : महान्यूज लाईव्ह
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू झाले. यावेळी विरोधी आमदारांनी कांदा, कापूस, हरभरा, द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करावी अशी मागणी लावून धरली होती. आज विरोधी पक्षनेते अजित पवार भलतेच आक्रमक झाले होते.
नाफेडसारख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्या, राज्य सरकारने केंद्र सरकारशी समन्वय साधावा अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. शेतकरी हवालदिल झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा पिकतो, राज्याचा ३३ टक्के वाटा देशाच्या उत्पादनात आहे, मात्र कांद्याला सर्वात कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे असे पवार म्हणाले.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्यास सुरवात करताच आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याकडे पाहून काही बोलण्यास सुरवात करताच एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून ऐ, बस खाली.. तुला शेतीतलं काय कळंतय? असा टोला मारला. त्यानंतर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सर्व आमदार हसू लागले. मात्र आदित्य यांना टोला लगावूनही ठाकरे गटाचे आमदार शांतच बसले.
यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारची भूमिका ठाम असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. हे सरकार न्याय देणारे शेतकरी असून आम्ही कारभार हातात घेतल्यापासून जे सरकारी निकष यापूर्वी ठरवले होते, त्यापेक्षाही अधिकची भरपाई आम्ही दिलेली होती असे स्पष्ट करीत कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारशीही संपर्कात राहू असे स्पष्ट केले.
मात्र या प्रश्नोत्तरानंतर सभागृह व विधीमंडळाच्या आवारात शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना लगावलेल्या टोल्याचीच चर्चा अधिक होती.