राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड शहरातील एका विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लॉजवर नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी एका नराधमावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, हा नराधम गुन्हा दाखल होताच फरार झाला असून दौंड पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. मयुर रमेश भोसले (रा. पायल रेसिडेन्सी तिसरा मजला राजधानी हॉटेल समोर दौड ता.दौड जि.पुणे.) असे याचे नाव आहे.
दरम्यान याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दौंड शहरात राहणारी पीडित महिला व आरोपी या दोघांची डिसेंबर 2021 मध्ये सोशल नेटवर्किंग च्या साइटवरून ओळख झाली होती. ही महिला दौंड येथे खासगी ठिकाणी कामाला होती. तिने भोसले यास माझे लग्न झाले असून मला एक लहान मुलगी आहे हे सांगितले होते, यावेळी तुझा आणि तुझ्या पतीचा घटस्फोट झाला, त्याची प्रक्रिया पूर्ण झाली की, मी तुझ्याशी लग्न करतो असे आश्वासन त्याने या पिडीत महिलेला दिले होते.
मात्र लग्न करण्याचे आमिष दाखवून त्याने दौंड परिसरातील लॉजवर नेऊन कोल्ड्रींक्समध्ये गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी शारीरीक सबंध ठेवले. तसेच त्याने मोबाईल मध्ये अश्चिल फोटो व व्हिडीओ काढले. पिडीत महिलेने पतीचा घटस्फोट घेतल्यानंतर लग्नाबाबत विचारले असता, घरच्यांना विचारून आपण लग्न करू असे त्याने सांगितले.
मात्र अचानकच त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. त्याबाबत मयुर याला विचारले असता तो म्हणाला की, मी आता काही करू शकत नाही व आमच्या घरच्या व्यक्तींपुढे जाऊ शकत नाही, त्यावरून या दोघांमध्ये भांडणे झाली. आरोपीने पिडीत महिलेच्या घरी जाऊन तिला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच वडीलांनाही शिवीगाळ व दमदाटी केली.
त्यानंतर घडलेला प्रकार कोणाला सांगू नको, जर तू सांगितला तर मी तुझे आणि माझे सोबतचे फोटो सोशल मिडीयावर टाकील. तसेच तुझ्या मुलीला व तुला मी जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. यानंतर पिडीत महिलेने दौंड पोलीस ठाण्यात धाव घेतली व घडलेला प्रकार दौंड पोलीसांना सांगितला. पोलीसांनी या पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संबंधित आरोपी हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.