राजेद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
बारावीच्या परीक्षेतील कॉपीचा प्रकार अजून कसा पुढे येईना अशा संभ्रमात असतानाच पुणे जिल्ह्याने त्याचा नंबर लावला आहे. तालुक्यातील केडगाव येथील जवाहलाल माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत केली म्हणून ९ शिक्षकांवर व दोन विद्यार्थ्यांवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भरारी पथकाने या ठिकाणी अचानक भेट दिल्यानंतर सामूहिक कॉपी करताना विद्यार्थी दिसले आणि भरारी पथकातील सिंघम अधिकारी किसन भुजबळ यांनी या प्रकारात मास्तरांनाच जबाबदार धरले. शिक्षकांमुळेच ही सामूहिक कॉपी झाल्याचे त्यांनी सांगत हा गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात किसन भुजबळ यांच्या फिर्यादीवरून परीक्षा केंद्राचा संचालक जालिंदर नारायण काटे, उपसंचालक रावसाहेब शामराव भामरे, प्रकाश कुचेकर, विकास दिवेकर, कविता काशिद, शाम गोरगल, जयश्री गवळी, सुरेखा होन, अभय सोननवर या शिक्षकांवर महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड व इतर परीक्षा कायदा १९८२ च्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल केला.
या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून एकाचवेळी ९ शिक्षकांना कामाला लावल्याने हे केंद्र राज्यात एकदम चर्चेत आले. यवत पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक हेमंत शेडगे पुढील तपास करीत आहेत.