सासवड – महान्यूज लाईव्ह
५०० किलो कांद्याचे फक्त २ रुपये मिळाले, ही बार्शीच्या राजेंद्र चव्हाण यांची बातमी अजून शिळी होत नाही, तोच पुरंदर तालुक्यातील ऋषी तिवटे यांनाही वांग्याने दणका दिला..५० हजार रुपये खर्चून कष्टाने केलेल्या वांग्याने फक्त १ हजार रुपये दिल्याने अखेर त्यांनी वांग्याचे पीकच उपटून काढले..
वांग्याची लागवड तिवटे यांनी १२ गुंठ्यात केली होती. त्यासाठी त्यांनी अगदी ५० हजारापर्यंत खर्च केला असे त्यांचे म्हणणे असून केवळ १ हजार रुपये उत्पन्न मिळाल्याने त्यांनी वांग्याची पुढील तोडणीही करायची नाही असे ठरवून टाकले.
त्यांनी ९५ किलो वांगी बाजारात नेल्यानंतर त्याचा लिलाव झाला आणि त्यात वाहतूकीचा १९० रुपये, तोलाई, हमाली सारा खर्च जाऊन फक्त ६६ रुपये तिवटे यांच्या हातात पडले. तीन-तीन महिने गुरासारखे राब -राबून फक्त ३ रुपये किलोला मिळणार असतील, तर त्या पिकाला ठेवायचेच कशाला? ग्राहकांचे रक्त शोषणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची घरे भरायची का? हाच विचार करून तिवटे यांनी वांग्याचे पीकच उपटून टाकले