बारामती – महान्यूज लाईव्ह
म.ए.सो. चे कै. गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.
२७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, कवी, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो.
यानिमित्ताने बारामतीत मराठीबद्दलची आपुलकी, गोडी व जिव्हाळा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून व्यक्त केला. कुसुमाग्रज यांची जयंती तसेच मराठी राज्यभाषा दिवस याचे औचित्य साधून विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुलांच्या दुपार विभागातील साहाय्यक शिक्षक श्रीयश सकोजी होते.
कार्यक्रमाची सुरुवात कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ईशस्तवन आणि स्वागत गीताने झाली. यावेळी श्रीयश सकोजी, मुख्याध्यापक उमेद सय्यद, उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे, पर्यवेक्षक शेखर जाधव, श्री. गायकवाड, सुनील खोमणे, स्वप्निल गोंजारी, तेजश्री शिंदे आदी उपस्थित होते.
श्रीयश सकोजी यावेळी म्हणाले, मराठी भाषा ही आपली माता आहे. मराठी भाषेला अधिकाधिक संपन्न करण्यासाठी व तिच्या समृद्धीसाठी ज्या साहित्यिक महात्म्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांच्याबद्दल आपण ऋणी असले पाहिजे. प्रत्येकाने मराठी भाषेतील साहित्याचा अभ्यास करून तिची किर्ती जगामध्ये दूरवर पसरवण्यात योगदान दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उमेद सय्यद म्हणाले, मूल जन्माला आल्यापासून सतत कानावर पडणारी भाषा ते मूल आपोआप आत्मसात करते आणि मग तीच त्याची मातृभाषा ठरते. अन प्रत्येकाला आपली मातृभाषा मातेसारखीच असते. भाषेतून समाजाची जडणघडण दिसते, प्रगतीची अवस्था स्पष्ट होतात. संत ज्ञानेश्वरांपासून ते शिवकालीन संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, श्रीसमर्थ रामदासस्वामी, श्रीदासोपंत इत्यादींनी आपली ही मराठी भाषा सुंदर ठेवली आणि साजरीगोजरी बनवली.
भजनदिंड्या आणि कीर्तने यांतून मराठी भाषा अधिक फुलली. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकोबांचे अभंग, गवळणी, भारूड आणि ओव्या-उखाणे, जोत्यावरच्या झोपाळ्यावर आणि माजघरातील जात्यावर गायिल्या जात. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी देखील याचे महत्त्व जाणून मराठी भाषेलाच राजकीय भाषेचा दर्जा दिला. अगदी याच काळापासून मराठी भाषा जागातील इतर लोकांना देखील समजली आणि मराठी संस्कृतीचा खऱ्या अर्थाने उदय झाला असे सय्यद यांनी सांगितले.
यावेळी जुनियर कॉलेज विभागातील कला विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. यावेळी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील शिक्षक स्वप्निल गोंजारी यांनी प्रशालेस पुस्तके आणि सरस्वती प्रतिमा भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना शेख, प्रास्ताविक सानिका काकडे व आभार मोनिका शहा यांनी मानले.