बाजार समितीही तेव्हाच जागी झाली, ज्यावेळी उभ्या महाराष्ट्रात छी-थू झाली..!
सोलापूर – महान्यूज लाईव्ह
बार्शी तालुक्यातील झाडी बोरगाव येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी १७ फेब्रुवारी २०२३ रोजी १० पोती कांदा सोलापूरच्या बाजार समितीमध्ये विकण्यासाठी नेला, या शेतकऱ्याला मिळालेल्या पैशापेक्षा तोलाई, हमाली अधिक झाली. मात्र या शेतकऱ्याने आपली व्यथा विरोधी पक्षनेते अजित पवार या्ंच्यापुढे व्यक्त केली आणि त्यानंतर उभ्या महाराष्ट्रात सोलापूरच्या बाजार समितीची छी-थू झाली. त्यानंतर मात्र खडबडून जागे झालेल्या बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याचा परवाना १५ दिवसांसाठी निलंबित केला.
बोरगावच्या राजेंद्र चव्हाण यांच्या या व्यथेची मांडणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मांडली. त्यानंतर या शेतकऱ्याने थेट अजित पवार यांच्यापुढेच गाऱ्हाणे मांडले. त्यावर अजित पवार यांनी येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा मांडण्याचे आश्वासन दिले.
बोरगावच्या राजेंद्र चव्हाण यांनी ५०० किलो कांदा विकायला नेला. मोटारभाडे, हमाली, तोलाई यातून फक्त २ रुपये ४९ पैसे चव्हाण यांना मिळाले. १ रुपया किलोने कांद्याचे पैसे मिळाले. बाजारात मात्र हाच कांदा १५ ते २० रुपये प्रतिकिलो दराने होता. चार -चार महिने कष्ट करून पिकवलेल्या का्ंद्याला रुपया जर मोल येत असेल तर हा देश शेतीप्रधान म्हणावा का? हा सवाल शेट्टी यांनी केला होता.
त्यानंतर बाजार समितीवरही प्रश्न उपस्थित केले गेल्याने समिती खडबडून जागी झाली व फक्त २ रुपयांचा चेक देणाऱ्या व्यापाऱ्यावर समितीने कारवाईचा बडगा उगारला. बाजार समितीचे सचिव सी.ए. बिराजदार यांनी संबंधित व्यापाऱ्याचा परवाना पंधरा दिवसांसाठी निलंबित केल्याचे सांगितले.