बारामती : महान्यूज लाईव्ह
परिस्थितीमुळे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मदतीची गरज असते आणि आचार्य अॅकॅडमी हेच काम करत आहे, असे प्रतिपादन बारामतीतील जेष्ठ शिक्षणतज्ञ प्रा माधव जोशी सर यांनी केले. आर्थिक आणि सामाजिक स्थिती विपरीत असतानाही शिकण्याचा ध्यास घेतलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठीच्या आचार्य अॅकॅडमीच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज बारामतीत शुभारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.
नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघाचे महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष आणि बारामतीतील जेष्ठ शिक्षक माधव जोशी यांच्या हस्ते या शोधयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. आचार्य अॅकॅडमीच्या स्व. रामोजी राघोजी मुटकूळे ज्ञानदान योजनेअंतर्गत ही ‘ शोधयात्रा गावोगावच्या ज्ञानेश्वरांची ‘ चे आयोजन करण्यात आले आहे. १ मार्चपासून सुरु होणारी ही शोधयात्रा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. तेथील शिक्षण क्षेत्राशी संबंधित शासकीय अधिकारी, पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ञ यांच्या भेटी घेणार आहे. या योजनेअंतर्गत 10 वी इयत्तेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून दरवर्षी २० विद्यार्थ्यांना जेईई, नीट आणि एनडीए सारख्या परीक्षात अव्वल यश मिळविण्यासाठी संपूर्ण शैक्षणिक मदत केली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या १००० प्रतिभावंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना पुढील तीन वर्षे वरील परीक्षामध्ये उज्जल यश मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रत्यक्ष जिल्ह्याजिल्ह्यात जाऊन या योजनेचा प्रसार करून अशा प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी या शोधयात्रेचे आयोजन केले गेले आहे.
महान्यूज लाईव्हचे संपादक घनश्याम केळकर आचार्य अॅकॅडमीच्या वतीने महाराष्ट्रातील या शोधयात्रेच्या निमित्याने प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहेत. यापूर्वी घनश्याम केळकर यांनी गरजु रुग्णांना मदत मिळावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्राची पायी परिक्रमा केलेली आहे. यावेळी ते गरजू प्रतिभावंत विद्यार्थ्यांंच्या शोधासाठी महाराष्ट्रभर फिरणार आहेत.
या शोधयात्रेसाठीचे आचार्य अॅकॅडमीचे प्रतिनिधी आणि महान्यूज लाईव्हचे संपादक घनश्याम केळकर यांचा यावेळी माधव जोशींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अॅकॅडमीचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे तसेच व्यवस्थापक बापू काटकर उपस्थित होते.