बारामती : महान्यूज लाईव्ह
रा.स्व. संघ जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत, या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त बारामती जिल्हा जनकल्याण समितीतर्फे बारामतीतील कै. ग.भि.देशपांडे म .ए सो. सभागृह येथे स्नेहमेळावा व समाजसेवेचा आदर्श ठरलेल्या संस्था आणि व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक हे प्रमुख वक्ते होते. श्री. नाईक यांनी जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांतात चालणाऱ्या सेवाकार्यांचा आढावा घेतला व सामाजिक दायित्व या विषयावर उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले. विभाग कार्यवाह विनोद देशपांडे, बारामती जिल्हा अध्यक्ष प्रसादराव गायकवाड, उपाध्यक्ष सौ स्नेहल नाईक, उदय पुरंदरे, कार्यवाह संदीप देशपांडे उपस्थित होते.
कु. सानिका राजेंद्र मालुसरे ही चॅम्पियन ज्युनिअर मास्टर बेंच प्रेस कॉम्पिटिशनमध्ये देशात पहिली आली. ज्येष्ठ विधीज्ञ दत्तात्रय तानाजी शिपकुले यांनी बारामती कोर्ट परिसरातील वृक्षरोपण व संवर्धन केले..
डॉ. वर्षा श्रीपाद सिधये यांनी बारामतीमध्ये प्लास्टिक पासून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे काम केले. सदाशिव जालिंदर कुंभार यांनी झिरपवाडी फलटण येथे गोशाळेच्या माध्यमातून गोसंवर्धन केले.
समीर किसन बनकर यांनी उंडवडी कडेपठार येथील गायरानावर 80हून अधिक प्रजातीचे 2650 देशी झाडे वृक्षारोपण व संवर्धन केले.
भोर तालक्यातील नसरापूर येथील विजय जंगम कातकरी शेतकरी बांधवांसाठी कार्य केले. भोर तालुक्यातील राजीव केळकर, ध्रुव प्रतिष्ठानच्या माध्यमातून करोना काळात पीपीई किट,रेशनकीट वाटप केले, फ्रेंड्स ऑफ नेचर क्लब, इंदापूर यांनी चिंकारा हरणाचे संवर्धन, चोरटी शिकार प्रतिबंध कार्य, वन्यजीवांसाठी छोटी तळी निर्माण करण्याचे काम केले. समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या या व्यक्ती व सामाजिक संस्थांचा जनकल्याण समितीतर्फे गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नागेश तनपुरे यांनी केले.