इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी (ता.इंदापूर) गावच्या हद्दीतील हॉटेल जय संतोषी माता या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा घालत कारवाई केली आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी विदेशी मद्यासह बिअरच्या बाटल्या ताब्यात घेत मुंबई दारूबंदी कायद्यानुसार हॉटेलचे संतोष प्रभाकर खाडे (वय 42 ) आणि प्रभाकर तुकाराम खाडे (वय 67) दोघे राहणार लाखेवाडी ता.इंदापूर जि.पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुरुवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी लाखेवाडी च्या हद्दीत बावडा – वालचंदनगर रोड लगत असणारे हॉटेल जय संतोषी माता येथे सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यामधील प्रभाकर खाडे हे लाखेवाडीचे माजी सरपंच आहेत.
लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सूत्रे हाती घेताच सरपंच चित्रलेखा ढोले यांनी ठोस भूमिका घेतली व लाखेवाडी पंचक्रोशीत सुरु असणारे दारूबंदी, मटका, जुगार सारखे अवैद्य धंदे मोडीत काढण्यासाठी 13 जानेवारी 2023 रोजी महिलांची विशेष ग्रामसभा घेत ठराव मंजूर केला होता. पोलीस विभागासह महसूल विभागालाही याबाबतचे निवेदन पाठवण्यात आले होते.त्यानंतर इंदापूर पोलीसांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन लाखेवाडीत धाड टाकत 2 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मटका चालवणाऱ्या दोन इसमांवर कारवाई केली होती.
मात्र इतर ठिकाणी कारवाई होईल अशी अपेक्षा असतानाच पोलिसांनी कारवाईबाबत हात आखडता घेतला. इतरांवर कारवाई करणे पोलिसांनी जाणीवपूर्वक टाळल्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे पोलिसांविषयी नाराजी पसरली आहे. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाचे निरिक्षक प्र. भा. पोळ यांच्या सुचनेनुसार कर्मचारी ए.के. पाटील यांनी लाखेवाडी हद्दीतील बावडा वालचंदनगर रोडलगत असणाऱ्या हाॅटेल जय संतोषी माता या ठिकाणी धाड टाकून 4 हजार 580 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यात देशी विदेशी मद्य बिअर अशा विविध 40 सीलबंद बाटल्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. अवैध दारू विक्री प्रकरणी त्यांच्यावर 65 ई, 81 व 83 अनुसार गुन्हा नोंद केला आहे. कारवाई करण्यात आलेल्या दारु विक्रेत्यांवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.