सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती लोकनेते कै. शहाजीराव पाटील यांच्या 44 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात नेत्रदीपक कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. कुस्ती मैदानात शहाजी केसरी साठी कुस्तीच्या लढतीमध्ये कुस्तीचा शहेनशहा पै.सिकंदर शेख याने जम्मूचा आंतरराष्ट्रीय पै.अमीन बनिया याचेवर एक चाक डावाने विजय मिळवित शहाजी केसरी किताब शनिवारी (दि.25) पटकाविला.
कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीशौकिनांची मोठी गर्दी दिसून आली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते पै. सिकंदर शेख यास मानाची गदा प्रदान करण्यात आली. तर दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र चॅम्पियन पै. माऊली (हर्षद) कोकाटे याने महाराष्ट्र केसरी पै.हर्षद सदगीरला दुहेरी पट काढून चितपट केले.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती लोकनेते कै.शहाजीराव पाटील यांच्या 44 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहाजी केसरी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या शहाजी आखाड्यामध्ये हजारो कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते शहाजी केसरी किताबासाठी पै. सिकंदर शेख व जम्मूचा पै. अमीन बनिया यांच्यामध्ये कुस्ती लावण्यात आली. अतिशय नेत्रदीपक अशी प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकणारी अविस्मरणीय लढत झाली. दोन्ही पैलवान अतिशय तुल्यबळ होते. प्रारंभी पै.अमीन बनिया यांने एकेरी पट काढून पै. सिकंदर शेख याचेवर कब्जा घेतला.
मात्र त्यातून पै.सिकंदर शेखने सुटका करून घेतली. त्यानंतर पै. सिकंदर शेख ने बगल डूब डाव करून पै.अमीन बनिया वर ताबा मिळविला. मात्र त्यातून पै.अमीन बनीयाने सुटका करून घेतली. दोन्ही पैलवान ताकदवान व चपळ असल्याने कुस्ती कोण जिंकणार याची उत्कंठा क्षणोक्षणी वाढत होती. प्रेक्षक श्वास रुखून धरून कुस्ती पाहत होते, त्याचवेळी पै. सिकंदर शेखने पुन्हा पै.अमीन बनीयावर पकड मिळवीत एक चाक डावाने चितपट केले. डोळ्याचे पारणे फेडणारी लढत झाली.
या मैदानामध्ये प्रेक्षणीय झालेल्या लढतीमध्ये पै. महारुद्र काळेल याने पै. शुभम सिदनाळे वर विजय मिळविला. तर पै. दादा मुलाणी विरुद्ध पै. वैभव माने, पै. मामा तरंगे व पै.मनीष रायते या दोन लढती बरोबरीत सोडविण्यात आल्या.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटी, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, पै.रावसाहेब मगर, महाराष्ट्र केसरी शिवाजी पाचपुते, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अस्लम काझी, पै. मंगलदास बांदल, कुस्ती कोच गणेश दांगट व विश्वास हरगुले, उत्तम फडतरे, प्रदीप जगदाळे, मयुरसिंह पाटील, करणसिंह घोलप, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रीतम पाटील आदीसह राज्यभरातून आलेले मल्ल तसेच इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कुस्ती शौकीन उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, लोकनेते शहाजीराव पाटील यांचे पुण्यतिथी दिनी प्रत्येक वर्षी 25 फेब्रुवारीला शहाजी कुस्ती आखाडा भरविला जाईल. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी कुस्तीला प्रोत्साहन दिले, असे नमूद केले.
शहाजी कुस्ती आखाडा यशस्वीरित्या पार पाडणेसाठी अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, ॲड.कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, कमाल जमादार, दत्तात्रय पोळ, कार्यकारी संचालक राम पाटील यांनी परिश्रम घेतले.
कुस्ती आखाड्याचे नियोजन पै.कमाल जमादार, पै.पिंटू काळे, विलासराव वाघमोडे, पै.नितीन माने, पै.अमर जगदाळे, पै.राजेंद्र चोरमले आदींनी केले. कुस्तीचे निवेदन युवराज केचे, प्रशांत भागवत यांनी केले. तर सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर व अमर निलाखे यांनी केले.