दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
स्व. लक्ष्मणराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी काय केलं ते मी ऐकून होतो. परंतु आज या ठिकाणी आलो आणि त्यांनी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांसाठी काय काय केलेलं आहे ते पाहिले. लक्ष्मणराव पाटील यांच्यासारखे नेतृत्व काय असते आणि कसे घडते ते अनुभवयास मिळालं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद दिल्यावर तो त्यांच्या पाठीमागे कुठपर्यंत राहतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे लक्ष्मणराव पाटील यांच्यावर नितांत व निस्वार्थी प्रेम करणारा कार्यकर्ता.. सर्वसामान्य माणसं घडली तरच समाज घडेल असे मत ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी व्यक्त केले.
किसन वीर साखर कारखान्याचे माजी चेअरमन, माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त किसन वीर कारखाना कार्यस्थळावर ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते.
यावेळी किसन वीरचे चेअरमन व आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, खंडाळ्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक व माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, बकाजीराव पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, प्रतापराव पवार, वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले, महादेव मसकर, शशिकांत पवार, बाळासाहेब सोळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजय कुवळेकर पुढे म्हणाले की, राजकारणात जी पारदर्शकता होती, ती पारदर्शकता कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. आपला नेता गेल्यानंतरसुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता जेव्हा म्हणतो की माझ्या घडण्यामागे माझा नेता आहे, हीच खऱ्या अर्थाने नेत्याला वाहिलेली आदरांजली आहे. कारण आजकालच्या राजकारणात आता कोण कोणाच्या मागे किती वेळ राहिल हे सांगता येत नाही, हे राजकारणातील वास्तव आहे.
आज आपण माणसं जोडणाऱ्या तात्यांसारख्या लोकनेत्याच्या जयंतीनिमित्तानं एकत्रित येऊन आदरांजली वाहुन त्यांच्या कार्याचं स्मरण करीत आहोत. स्पष्टवक्तेपणावर प्रेम करणारी व्यक्तीच जनतेच्या मनात राहते. नेता स्पष्टवक्ता असला तर त्याचा परिणाम काय होईल, हे त्याला माहिती असतं, त्यामुळे त्यांचे गांभिर्यही नेत्याला माहित असतं. कामाशिवाय मोठेपणा मिळत नाही आणि जरी मिळाला तर तो कायमस्वरूपी नसतो. विधायक काम करणारा नेता म्हणजे तात्या. तात्यांनी कायमच समाजाला नविन दिशा देण्याचे काम केले. तात्यांनी केलेल्या विधायक कामांमुळेच ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या लक्षात चिरंतर राहणार आहेत. सामान्य माणसावर प्रेम केल्यानेच नेते मोठे होत असतात. आजकाल कृतज्ञतेचा विसर पडल्याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले की, सामान्य माणसाला हात देणारा नेता म्हणजे तात्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून तात्या पवारसाहेबांच्या पाठीमागे राहिले. गावच्या सरपंचपदापासून आपल्या राजकारणाची सुरूवात केली ते लोकसभेपर्यंत त्यांनी अनेक राजकीय महत्वाची पदांवर काम केले. तात्यांनी कायमच सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम केले. त्यामुळेच आज सर्वसामान्यांच्या मनात तात्यांविषयी आदर, प्रेम असल्याचे चित्र दिसून येत आहे. किसन वीर कारखाना सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या शेअर्सरूपी भाग भांडवल हे खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलेली पोहोच पावतीच असून भविष्यात कारखाना हा सुस्थितीत येण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
प्रमोद शिंदे म्हणाले, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचा राजकीय वारसा जपणार नेता म्हणजे लक्ष्मणराव पाटील. तात्यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकसारखी वागणूक दिली त्यांच्यामध्ये कधीच भेदभाव केला नाही. कायमच बेरजेचे राजकारण केल्यामुळेच ते राजकारणात यशस्वी झाल्याचे दिसून येते. तात्यांनी जर कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव केला असता तर माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती राजकारणात एवढ्या मोठ्या पदावर नसता. तात्यांना सत्तेचा कधीही गर्व नव्हता. त्यांनी सत्तेचा वापर फक्त सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठीच केलेला दिसून आला. कारखाना चुकीच्या लोकांच्या हातात गेल्यामुळे काय परिस्थिती आहे हे दिसून येत आहे. परंतु चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना लवकरच सुस्थितीत येईल यात कोणतीही शंका नसल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी नितीन भुरगुडे पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, बाळासाहेब सोळस्कर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, प्र. कार्यकारी संचालक अशोक शिंदे, दत्तात्रय ढमाळ, शिवाजीराव महाडीक, अनिल सावंत, तानजीराव मदने, रमेश गायकवाड, विक्रांत डोंगरे, मदन भोसले, मोहनराव शिंदे, हेमलता ननावरे, दादा पवार, संग्राम पवार, दिलीप हगीर, चरण गायकवाड, राजेंद्र चोरगे, रमेश धायगुडे, भईजचे उपसरपंच शुभम पवार, सुधीर पाटील, नारायण नलावडे, सुजितसिंह जाधवराव, गिरीश कडाळे, सुभाष साळुंखे, मनिष भंडारी, राजेंद्र सोनावणे, कांतीलाल पवार, अनिल चव्हाण अॅड. रविंद्र भोसले, हेमलता ननावरे, बाळासाहेब शेळके, दिपक बाबर, नितीन मांढरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.