राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह.
पुण्यातील माजी सैनिकाने पाटस येथील शेतकऱ्याला शासनाने भूमीहीन म्हणून वाटप केलेले वनविभागाचे सहा एकर क्षेत्र कुलमुखत्यार पत्र व बिनताबा साठेखत करून लाटल्याचा प्रकार समोर आला आहे.
शासनाने मागासवर्गीय समाजाला भूमिहीन म्हणून वाटप केलेली शेतजमीन हडप करून त्या शेतकऱ्याला भूमीहीन करून टाकल्याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात तिघांजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. विलासचंद्र शिवराम तांदळे, सौ.प्रभा विलासचंद्र तांदळे, आदित्य विलासचंद्र तांदळे ( सर्व रा.कोथरूड,पुणे ) यांच्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस येथील शेतकरी कै.लक्ष्मण बारकु माखर यांना शासनाने भूमीहिन म्हणून वन विभागातील सहा एकर जमीन दिली होती.
या सहा एकर जमीनीपैकी २ एकर शेतजमीन विलासचंद्र शिवराम तांदळे त्यांची पत्नी सौ. प्रभा विलासचंद्र तांदळे व मुलगा आदित्य विलासचंद्र तांदळे यांनी १ नोव्हेंबर २००७ रोजी कुलमुखत्यार व बिन ताबासाठे खत करून शेतकरी लक्ष्मण माखर यांच्याकडून करुन घेतले.
मात्र प्रत्यक्षात २६ मार्च २०२२ रोजी विलासचंद्र तांदळे यांनी सर्व ६ एकर जमीन त्यांच्या पत्नीच्या मे. साईप्रभा कंपनीला केली व त्यासाठी पाहीजे असणाऱ्या कोणत्याही शासकीय परवानग्या घेतल्या नाहीत, तसेच कुलमुखत्यार पत्र व बिन ताबासाठे खतामधील कोणत्याही अटी व शर्तींची पुर्तता केली नाही तसेच शेतकरी कै. लक्ष्मण बारकु माखर हे मयत असताना जिवंत असल्याचे दाखवून २६ मार्च २०२२ रोजी केडगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयाला खोटे घोषणापत्र तयार शेतकरी व शासनाची फसवणुक करीत दोन एकर क्षेत्र ऐवजी सहा एकर क्षेत्र खरेदीखत करून लाटली.
याबाबत कै.लक्ष्मण बारकु माखर यांचा मुलगा पोपट लक्ष्मण माखर याने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तिघांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. यवत पोलीस ठाण्याचे फौजदार संजय नागरगोजे हे अधिक तपास करत आहेत.