शिरूर – महान्यूज लाईव्ह
ग्रामीण भागात विवाह समुपदेशन अधिकाधिक प्रमाणात व्हायला हवे यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ.दिपाली जाधव यांनी व्यक्त केले.
मांडवगण फराटा येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत विवाहपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. दिपाली जाधव बोलत होत्या.
यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाल्या, विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानता व वैवाहिक कायदेशीर बाबींची जाणीव निर्माण केली पाहिजे. ग्रामीण भागात वैवाहिक समायोजन आणि लैंगिक शिक्षण, विवाहापूर्वी समुपदेशानाची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वरवरच्या आकर्षणापलीकडे समोरच्याचे व स्वतःचेही गुण-दोष डोळसपणाने तपासून पहावे.
तसेच स्त्री ही समाजाची निर्माती आहे, मुलींनी आर्थिक सक्षम होऊन आत्मबळ वाढवले पाहिजे यासाठी मुलींना प्राणायामाचे महत्व देखील पटवून दिले. विवाह समुपदेशन ग्रामीण भागात झाल्यास अनेक समस्या सोडविण्यात यश येईल असे ही त्या यावेळी म्हणाल्या.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक सचिव मृणाल फराटे पाटील यांनी सांगितले की, विवाह झाल्यानंतर विवाहितांच्या विविध समस्या गंभीरपणे समोर येत असून विवाहपूर्व समुपदेशन होणे गरजेचे बनले आहे. कौटुंबिक नातेसंबंध सुदृढ असणं हे भावनिक सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं त्यासाठी महाविद्यालयातच जनजागृती व्हायला हवी या उद्देशाने प्रयत्न केले जात आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे पाटील , सचिव मृणाल फराटे पाटील, प्राचार्य प्रविण कुरुमकर, प्रा.सुरेश जगताप , प्राचार्य डॉ. हेमंत कांबळे, प्राचार्य डॉ.विवेक सातपूते, सर्व प्राध्यापक व शिक्षकत्तेर कर्मचारी उपस्थीत होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन विस्तार विभाग समन्वयक प्रा.जयराम पवार यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.रमेश शितोळे यांनी केले व आभार प्रा.सोनाली म्हेत्रे यांनी मानले.