पुणे – महान्यूज लाईव्ह
कसबा व चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपचे पदाधिकारी पोलिसांच्या समक्ष पैसे वाटत असल्याच्या मुद्द्यावरून कसबा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर आज उपोषण करणार आहेत. दरम्यान चिंचवडमध्ये पैसे वाटतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूका यंदा गाजल्या. भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजप व महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा कस लागला. सहानुभूतीच्या ऐवजी राज्यातील राजकारण व विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या या प्रचारात दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न झाला.
कसब्यात प्रचार संपताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटले व पोलिसांच्या समक्षही पैसे वाटण्यात आले असा आरोप उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तर दुसरीकडे चिंचवडच्या भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांच्या समर्थक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कमळाच्या मतदार याद्या घेऊन पैसे वाटताना त्यांना ताब्यात घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
यासंदर्भात धंगेकर यांनी आज सकाळी कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. अर्थात त्यांना परवानगी मिळते का हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे. मतांसाठी भाजपने पैसे वाटले असून ही लोकशाहीची हत्या आहे, त्यामुळे आपण हे उपोषण करणार आहोत असे ते म्हणाले.
दरम्यान यासंदर्भात भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रि्या समोर आली नसून स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी मात्र धंगेकरांना पराभव स्पष्ट दिसत असल्याने त्यातून पळवाट शोधण्यासाठी व सहानुभूती मिळविण्यासाठी हा खटाटोप केला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.