शिरूर – महान्यूज लाईव्ह
शिरसगाव काटा (ता.शिरूर) व वडगांव रासाई येथील दोन युवकांनी अवघ्या १२ दिवसांत पुणे ते कन्याकुमारी अशी सायकल मोहीम यशस्वी केली.
शिरसगाव काटा (ता.शिरूर) येथील वैभव विश्वनाथ चव्हाण व राहुल अशोक शितोळे (रा. वडगांव रासाई) असे सायकल मोहीम फत्ते करणाऱ्या युवकांची नावे आहेत.
आवड असली की कोणतही ध्येय गाठणे दूर नाही हे दाखवून दिले आहे, शिरूर तालुक्यातील या दोन युवकांनी…! पुणे येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून सध्या नियुक्तीस असलेले वैभव चव्हाण यांना पूर्वी पासून सायकलिंग ची आवड आहे.
त्यांनी या पूर्वी पुणे ते गोकर्ण (जिल्हा. कर्नाटक) असा सुमारे ५५० किलोमीटर अंतर या पूर्वी केवळ चार दिवसांत पूर्ण केले आहे.त्यामुळे पुणे ते कन्याकुमारी अशी मोहीम सायकल वर पूर्ण करायचीच असा ध्यास घेतला होता. त्यानुसार वैभव चव्हाण यांनी एक महिना सराव करत दि.१२ मार्च रोजी पुणे येथून सायकलवर प्रवास सुरू केला.
प्रवासादरम्यान टेंभुर्णी, मोरबागी, अलमट्टी, होस्पटे, सिरा, होसर, थोप्पुर, करुर, मदुराई, तिरूनावेली आदी अकरा ठिकाणी मुक्काम केला व बाराव्या दिवशी सायकल वर कन्याकुमारी मोहीम यशस्वी केली.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, प्रवासाची आवड असल्याने संपूर्ण भारत सायकल मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून यावेळी दक्षिण भारतात प्रवास केला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांनी मोठे सहकार्य केले. प्रवासात स्थानिक संस्कृती,खाद्य पदार्थ आदी बाबी अभ्यासता आल्या. नागरिकांनी काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली. तामिळनाडू व कर्नाटक राज्यात पाच पाच दिवस प्रवास झाला.
बारा दिवसांत १५१० किलोमीटर इतके अंतर सायकलवर प्रवास करण्यात आला. या मोहिमेत राहुल शितोळे यांची साथ लाभली. शेवटच्या दोन दिवसांत दमट हवामानात त्रास जाणवला. परंतु त्याच्यावर मात करून सदर मोहीम पूर्ण करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. वैभव चव्हाण व राहुल शितोळे या युवकांच्या यशाबद्दल शिरसगाव काटा, वडगांव रासाई परिसरात अभिनंदन केले जात आहे.