कोल्हापूर : महान्युज लाईव्ह
कणेरी मठात झालेल्या गायींच्या मृत्यूची जबाबदार अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून गाईंच्या खुन्यांना शिक्षा करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रमेश वडणगेकर व अनिल चव्हाण यांनी केली आहे
यासंदर्भात चव्हाण व वडणगेकर यांच्या म्हणण्यानुसार कोल्हापूर जवळच असलेल्या कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत लोकोत्सव परिषद प्रदर्शन प्रवर्तन असे वीस ते 26 फेब्रुवारी भरले आहे! भारतीय परंपरेला पुढे करून हिंदू राष्ट्राचे स्वप्न बाळगणाऱ्या धार्मिक पक्षाकडून कोट्यावधी रुपये यांचा लाभ करून घेणे, जमले तर राजकीय खुर्ची बळकावणे आणि या महोत्सवाच्या निमित्ताने गावागावातून भाजपच्या आमदारकीला उत्सुक असणाऱ्या तरुण पोरांकडून वेगवेगळ्या वस्तूंचा कोट्यावधी रुपयाचा खजिना गोळा करणे आणि त्याला दान आणि दक्षिणा असे गोंडस नाव देणे हे चालूच होते!
या समारंभाला अनेक उपक्रमाने सजवले होते त्यातील एक उपक्रम गोशाळा होता! भारतीय देशी गाईंचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून गाईंचे संगोपन 20 एकरावर पसरलेल्या गोशाळेत केले जाते. तसेच शेतकऱ्यांना गोपालना बद्दल मार्गदर्शन केले जाते. 22 प्रजातींच्या 1000 पेक्षा जास्त गायी इथे पाहायला मिळतील असे महाराजांनी सांगितले होते. आणि त्यानुसार प्रदर्शन चालू होते.
गावागावातून गोळा केलेल्या अन्नाचा साठा इतका मोठा झाला की, आता ते कोणाला घालायचे, तर गाईंना..! आणि त्या शिळ्या अन्नातून विषबाधा होऊन काही गाई मेल्या आणि काही गंभीर आजारी आहेत.
2024 च्या निवडणुकांची तयारी म्हणून फुटकळ धर्म मार्तंड देव आणि धर्माच्या जत्रा भरवत आहेत. याला शासनाची पूर्ण मदत आहे. लोकांना धार्मिक अफू चारून गुंगीच ठेवायचं. महागाई, बेरोजगारी, प्रदूषण, सरकारी बँकांचे लूट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, इकडे लक्ष जाऊ नये म्हणून असले उद्योग सुरू आहेत.
नियोजनशून्य भडक धार्मिक कार्यक्रम हे यांचे वैशिष्ट्य आहे अशाच एका महाराजाच्या जत्रेत रुद्राक्ष नावाची बी मिळवण्यासाठी झुंबड उडाली आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. आता कोल्हापूरच्या बुवांच्या जत्रेत गाईंचे मृत्यू झाले आहेत. यापूर्वी गोमांस सापडले असा खोटा आरोप करून निरपराध तरुणांना तथाकथित गोरक्षकांनी मारहाण केली आहे ठार मारले आहे पण आता इतक्या गाई मरून सुद्धा गोरक्षक काहीच बोलायला तयार नाहीत.
विशेष म्हणजे हा मठ लिंगायतांचा असून सुद्धा महात्मा बसवण्णांच्या विचाराचा एक कणही इथे दिसत नाही. जत्रा यशस्वी करण्यासाठी शाळा कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी अभ्यास सोडून उन्हात सेवा देत आहेत. शासकीय अधिकारी सरकारी पगार खाऊन महाराजांच्या मागे शेपूट हलवत आहेत.
या सर्वांच्या नियोजन शून्य वर्तनाने गाईंचे मृत्यू झाले आहेत.
या जत्रेला भेट देणारे आमदार खासदार मंत्री संत्री शासकीय अधिकारी तथाकथित गोरक्षक यापैकी एकाच्याही हृदयाला गाईंचे मृत्यू पाझर पडू शकले नाहीत. संयोजकांना याबद्दल जाब विचारायची धमक एकामध्येही नाही.
आता तरी जबाबदार अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून गाईंच्या खुन्यांना शिक्षा करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रमेश वडणगेकर व अनिल चव्हाण यांनी केली आहे