दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील ओझर्डे गावची शाळा ही महाराष्ट्रातील पहिली स्टेम लॅब असलेली अत्याधुनिक शाळा बनली, या शाळेतील अधुनिकीकरणाच्या कामाचे उद्घाटन नुकतेच झाले. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी पतित पावन विद्यामंदिर ओझर्डे या शाळेत हे उदघाटन झाले.
यावेळी शाळेचे कंपाउंड, वर्ग खोल्या नूतनीकरण, ध्वज स्तंभाच्या कामाचे पूजन अशा विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच EDGEFX मार्फत महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली STEM लॅब या शाळेत उभारण्यात आली आहे, तिचे उद्घाटन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बेलोशे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अभयकुमार साळुंखे होते.
त्यांनी बापूजींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या काळातील अडीअडचणी सांगितल्या. सन 1960 साली स्थापन झालेल्या शाळेचा पूर्वीचा अवतार व पन्नास वर्षानंतरच्या शाळेचा अवतार यात खूप बदल झालेला दिसून येत असल्याची टिप्पणी प्रा. साळुंखे यांनी केली.
ते पुढे म्हणाले, मराठी भाषेला प्राधान्य देऊन पतित होऊन पावन विद्यार्थी घडावेत व ते पुढील आयुष्यात उज्वल व्हावेत. बापूजींनी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेऊन आपले पूर्ण आयुष्य समाज घडवण्यात घालवले. त्यांना संत गाडगेबाबा यांचा मोठा सहवास लाभला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय केले पाहिजे यातून या संस्थेचा विचार मनात आला व त्यांनी शिक्षण तळागाळात पोहोचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले.
बैलगाडी मधून त्यांनी 11 जिल्ह्यात 176 शाळा चालू केल्या बापूजी ज्या गावात जायचे त्या गावातील लोकांना ते आवाहन करून लोकांची साथ घेऊन तेथे शाळा चालू करत होते. समाजात शिक्षण प्रसार करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता व लोकांनी शिक्षण घेऊन आपला देश प्रगत करावा असे त्यांना वाटत होते. ग्रामीण भागात शिक्षण नव्हते म्हणून त्यांनी ग्रामीण भागात आपले लक्ष केंद्रित केले.
त्यामुळे आज अडीच लाख लोक या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रात शाळा शिकत आहेत. याच लोकांना बापूजींनी ज्ञानाचा वसा दिला. आजच्या काळात शिक्षक हे गटबाजी करत असतात, परंतु या संस्थेतील शिक्षक बापूजींचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. गांधीवादी विचार मनात घेऊन या संस्थेची स्थापना बापूजींनी केली. बापूजींनी शिक्षकांच्या मनात चांगले विचार बिंबवल्याने विद्यार्थी देखील चांगले घडले असे प्रा. साळुंखे म्हणाले. अभय कुमार साळुंखे यांनी Education fx हैदराबाद या कंपनीचे आभार मानले. फाउंडेशनने सात लाखाची मदत करून शाळेस पुनर्जीवित केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले.
या कार्यक्रमास प्रा. अभयकुमार साळुंखे, फाउंडेशन सातारा,जेष्ठ शाळेसाठी जागा देऊन योगदान देणारे ज्येष्ठ पत्रकार दौलतराव पिसाळ, शहीद सोमनाथ तांगडे यांच्या वीर पत्नी रेश्मा तांगडे, अजित फरांदे, शाळा व्यवस्थापन समिती, स्टीम लॅबचे राजदीप जमादार, मनोज यादव, प्रकाश कुंभार, गणेश बाबर, पत्रकार आशिष चव्हाण, गावचे सरपंच, ग्रामस्थ, शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक व माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. आभार श्री. फरांदे यांनी मानले.