दौलतराव पिसाळ- महान्यूज लाईव्ह
वाई- घटना वाई तालुक्यातील आहे.. एसटीचा पगार कमी आहे, म्हणून प्रामाणिकपणाची वाट मात्र सोडायची नाही अशी धारणा असलेल्या कर्मचाऱ्याचीही ही गोष्ट आहे..! सव्वा लाखांचे दागिने आणि रोख रकमेची पर्स सापडली.. मात्र ती ज्याची त्याला मिळाली पाहिजे यासाठी सुरवातीला धडपड करणाऱ्या या कर्मचाऱ्याने पर्स मालकाकडे सूपूर्त केल्यानंतर देऊ केलेले बक्षिसही नम्रपणे नाकारले..आणि वाईकरांच्या प्रामाणिकतेत एक मानाचा तुरा रोवला!
वाई आगारातील सुरक्षारक्षक भगवान निकम यांची ही कहाणी. ज्याचा आदर्श घ्यावा असे आवाहन खु्द्द आगारप्रमुख बालाजी गायकवाड यांनी उत्स्फूर्तपणे केले.
सातारा – वाई या विनावाहक बसमध्ये एका महिला प्रवाशाची सव्वा लाख रुपयांचे दागिने असलेली पर्स घाईगडबडीत वाईत उतरताना बसमध्येच खाली पडली. बसची तपासणी करीत असताना वाई आगाराचे सुरक्षारक्षक भगवान निकम यांना सापडली.
ती पर्स घेऊन ते सुरक्षारक्षक केबीन मध्ये आले व त्यांची पर्स तपासली. त्यामध्ये दागिने व ४०० रुपये रोख असा ऐवज होता, सोबत एसटीचा पासही होता. काही वेळाने पर्स हरवलेल्या महिलेचे नातेवाईकही आगारात पोचले. त्यांनी भगवान निकम यांना पर्स हरवल्याची माहिती दिली.
मग निकम यांनी त्यांना त्या पर्समध्ये नेमके काय होते याची विचारणा केली व ओळख करून घेऊन ती पर्स यांचीच असल्याची खात्री करून घेतली आणि त्यांच्याकडे सूपूर्त केली. मग पर्स सापडल्याने आनंदाने त्या प्रवासी महिला व तिच्या नातेवाईकांनी बक्षिस देऊ केले.
तेव्हा निकम यांनी हे बक्षिस नाकारले. ही माहिती मिळताच आगारप्रमुख बालाजी गायकवाड यांनी निकम यांचे कौतुक केले.