दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई, दि. 24 – येथील रामडोह आळीतील रहिवाशी सिध्दार्थ संतोष क्षीरसागर याच्या तबला वादनाने गुरूवारी वाईकर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, वाईतील रामडोह आळी कृष्णाबाई उत्सवाचे.!
उत्सवाच्या काळात वाईकर नागरीकांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामध्ये अनेक स्थानिक कलाकारांना संधी देण्यात आली. यामध्ये सिध्दार्थ क्षीरसागर याने तबल्यामधील अनेक अदाकारींव्दारे प्रेक्षकांची मने जिंकली.
वाईतील संसार सुविधा या नामांकित समूहाचे मालक नितिन देशमुख यांनी सिध्दार्थला तबल्याचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवत सिध्दार्थने मुंबई येथील आखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या प्रवेशिका प्रथम परिक्षेमध्ये त्याने विशेष प्रावीण्य मिळविले आहे. सिध्दार्थचे वडील वाई अर्बन बँकेत नोकरीस आहेत. तर आई सोनाली क्षीरसागर यांची साईसिध्द काँप्युटर्स फर्म आहे.
सिध्दार्थ क्षीरसागर हा गेल्या चार वर्षांपासून तबला वादन करीत असून सध्या तो वाईतील ब्लॉसम चिल्ड्रन्स अँकेडमीमध्ये नववीच्या वर्गात शिकत आहे. तबला वादनामध्ये त्रिताल, जपताल, रूपक, केरवा, दादरा, दीपचंदी असे ताल असून त्यामध्ये त्याने प्रावीण्य मिळविले आहे. सिध्दार्थला भजनी धुमाळी प्रकारातही तबला वाजवता येतो. रामडोह आळी कृष्णाबाई उत्सवात त्याने विविध गाण्यांवर तबला वाजवून उपस्थितांची मने जिंकली. उत्सवातील या कार्यक्रमासाठी वाईकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.