सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील उजनीकाठच्या फ्लेमिंगोसाठी प्रसिध्द असलेल्या एका गावात आज वेगळीच घटना घडली. ग्रामपंचायतीच्या शिपायाला पायरीवर उपसरपंचाच्या पतीने बसवले. म्हणून ग्रामसेवकाला विचारणा करणाऱ्या महिला सरपंचाला उपसरपंचाच्या पतीने सरपंचाला शिवीगाळ केली.. मग
हाताला धरून लज्जास्पद वर्तन केले…मग मात्र उपसरपंचाच्या पतीला चपलेचा प्रसाद मिळाला.. शिवाय वर पुन्हा पोलिस ठाण्याचीही हवा खायला मिळणार हे नक्की झाले..
या घटनेत उपसरपंचाच्या पतीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात महिला सरपंचांनी फिर्याद दिली होती. ही घटना आज (ता.२४) रोजी घडली.
आज शुक्रवार (दि.२४) रोजी या ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल भोई हे ग्रामपंचायतीच्या पायरीवर बसले होते. महिला सरपंचांनी त्यांना बसण्याचे कारण विचारले, त्यावर उपसरपंचाच्या पतीने बसवले अशी माहिती भोई यांनी दिली. त्यावरून ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या व त्यांनी ग्रामसेवकाकडे विचारणा केली.
ती चर्चा सुरू असतानाच उपसरपंचाचा पती तेथे आला, त्याने सरपंचांनाच अश्लील शिवीगाळ केली व उजवा हात धरून लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले. त्यावरून सरपंचांनी भिगवण पोलिसांकडे फिर्याद दिली.
दरम्यान या घटनेनंतर उपसरपंचाच्या पतीस चपलेने मारहाण करण्यात आल्याची माहिती पुढे आली असून सरपंचांच्या निकटवर्तीयांनी देखील या घटनेमुळे त्याला चपलेचा प्रसाद मिळाल्याची माहिती दिली. दरम्यान या घटनेचा पुढील तपास भिगवणचे सहायक निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.