हेमंत थोरात, वालचंदनगर
काहीच नव्हते हातात.. फक्त एक मारुती ओम्नी वालचंदनगर पोलिस ठाण्यासमोरून जाताना सीसीटिव्हीत दिसली.. ना तिचा नंबर होता, ना त्या वाहनातील कोणी बसलेले दिसले.. पण गुन्ह्याचा तपास सोडतील, तर ते पोलीस कसले?… वालचंदनगर पोलिसांचे एक पथक दोन दिवस फक्त इंदापूर- बारामती रस्त्यावर जिथे जिथे रस्त्याच्या दिशेने सीसीटिव्ही असतील, ते शोधत बसले.. वेळाच्या कड्या जुळवत राहीले.. अन त्यांना त्यात यश आले..!
वालचंदनगर पोलिसांनी मोठ्या हिकमतीने शोधलेल्या या एका आगळ्यावेगळ्या अपघाताच्या गुन्ह्याच्या शोधाबद्दल पोलिसांना ना केवळ दाद द्यावी लागेल, उलट त्यांच्या या कौशल्याबद्दल त्यांना गौरवितच करावे लागेल.. कारण दोन दिवसांपूर्वी दोन मैत्रिणींचा जीव घेणारा वाहनचालक त्यांनी मोठ्या कौशल्याने लातूरमध्ये जाऊन पकडला.
विलास तुकाराम गुरमे (रा. कोल्हेनगर, लातूर) असे या वाहनचालकाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली, त्याचबरोबर ज्या वाहनाने हा अपघात घडवला, ते (एमएच २४ एएस ३५२४) वाहनही पोलिसांनी जप्त केले.
ही कामगिरी पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगरचे सहायक निरीक्षक विक्रम साळुंखे, फौजदार खंदारे, पोलिस हवालदार डोईफोडे, हवालदार गुलाबराव पाटील, पवार, समीर शेख, हमीद शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
गेली दोन दिवस सूरू होती तपासणी..
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडली. जंक्शन(आनंदघन) येथील अनिता शिवाजी शिंदे (वय 40 वर्ष रा. जंक्शन आनंदघन तालुका इंदापूर जि. पुणे), अर्चना श्रीशैल्य सन्मट (वय 42 वर्षे राहणार जंक्शन, आनंदनगर तालुका इंदापूर) या दोघी व्यायामाला निघाल्या होत्या. मात्र मारुती ओम्नी वाहनाने त्यांना धडक दिली.
या धडकेत त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या, मात्र त्यांना धडक देणारा मारुती ओम्नी वाहन व चालक तेथून न थांबता फरार झाले. त्यामुळे अज्ञात वाहनाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. अर्थात परिसरात या घटनेविषयी असलेला संताप लक्षात घेत पोलिसांनी यात तातडीने तपासाला सुरवात केली.
पो्लिसांनी या घटनेतील सीसीटिव्हीचे फुटेज प्रसिध्दीस देऊन याची माहिती आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. मात्र तेवढ्यावर न थांबता पोलिसांनी इंदापूर- बारामती रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांची सीसीटिव्ही फुटेजही तपासण्यास सुरवात केली,
यानंतर सरडेवाडी येथील टोलनाक्यावर पोचून नेमक्या दरम्यानच्या काळातील वाहनांची माहिती घेतली. योगायोगाने काही मारुती ओम्नी वाहने त्या काळाच्या दरम्यान तेथून ये-जा करताना दिसून आली.
मग पोलिसांनी तांत्रिक माहिती घेऊन एक मारुती वाहन नेमके हेरले, जे त्याच वेळेच्या दरम्यान टोलनाक्यावर आढळून आले. त्याचा क्रमांकही मिळाला व त्याच्या मालकाचा मोबाईल क्रमांकही आढळून आला. मग पोलिसांनी त्यांच्या पध्दतीने तपास केला आणि पोलिसांना त्यात यश आले.
विलास गुरमे याच्याच वाहनामुळे हा अपघात घडला होता. विलास यास लातूरमध्ये जाऊन पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केली. या घटनेचा पुढील तपास वालचंदनगर पोलिस करीत आहेत.