दौंड तालुक्यातील चौफुला येथील घटना!
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी चैफुला हद्दीतील हाॅटेल जय तुळजाभवानी समोर कार उभी करून जेवणासाठी गेलेल्या एका अधिकाऱ्याला ५० हजाराला बांबू बसला आहे, ५० हजारासह बँकेचे चेकबुक व इतर महत्वाची कागदपत्रे ही अज्ञात चोरांनी कारची काच तोडून लंपास केल्याची घटना घडली आहे.
ही माहिती यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. शशीकांत दादाभाऊ गाडेकर ( वय ३८ , व्यवसाय नोकरी, हिंगणेखुर्द सिंहगडरोड पुणे) हे गुरुवारी (दिनांक २३) सायंकाळी पावणे सहा वाजता पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चौफुला – बोरीपार्धी हद्दीतील हॉटेल जय तुळजाभवानी हाॅटेल समोरील मोकळ्या जागेत गाडी लावून जेवण करण्यासाठी हाॅटेलमध्ये गेले.
जेवण करून माघारी येऊन पाहिले असता गाडीच्या वाहनचालकाच्या बाजूला पाठीमागील दरवाज्याची काच फोडून गाडीत ठेवलेली बॅग व त्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम ५० हजार व विविध बॅंकांचे कोरे चेकबुक व इतर महत्वाचे कागदपत्रेही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली.
याबाबत गाडेकर यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर यवत पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यवत पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पुणे सोलापूर महामार्गावरील तसेच रस्त्यालगत असलेले हॉटेल ही आता सुरक्षित नाहीत. जेवण करण्यासाठी वाहन चालकांनी वाहने व महत्वाची कागदपत्रे काळजी पूर्वक व सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. असे आवाहन यवत पोलीसांनी केले आहे.