इंदापूर तालुक्यात वाळू माफियांनी डोके वर काढले.. उजनी पाणलोट क्षेत्रात प्रचंड बेकायदेशीर वाळू उपसा.. इंदापूर पोलीसांची वाळू माफियांवर कारवाई…42 लाखांचा मुद्देमाल जप्त..नऊ जणांवर गुन्हा दाखल..!! सात जणांना अटक तर दोन फायबर बोट मालक फरार..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर तालुक्यात उजनी च्या पाणलोट क्षेत्रात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे चित्र आहे. उजनीच्या काठावरील सुगाव गावानजीक बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती इंदापूर पोलीसांना मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकत वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करत ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये सात जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोन फायबर बोट मालक फरार झाले.
इंदापूर तालुक्यात उजनी च्या पाणलोट क्षेत्रात वाळू माफियांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात विक्रम घळाप्पा जमादार व लक्ष्मण निळकंठ सुर्यवंशी यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली. इंदापूर पोलिसांनी दोन बोट मालकांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, मौजे सुगाव (ता. इंदापुर) गावचे हददीत उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (दि.२३) रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास काही जण गौण खनिजाचे अनधिकृतपणे उत्खनन करून ते पाणलोट क्षेत्राचे किना-यावरील खोदलेल्या खडडयाच्या दिशेने घेऊन जात असताना पोलिसांना खबर लागली.
पोलिसांनी स्पीड बोटीच्या मदतीने पाठलाग करुन सुगांव पासून दोन किलोमीटर अंतरावरून फायबर बोट व सक्शन बोटचालक मन्सुर रेहमान पलटु शेख (वय ४६ वर्षे), आश्रफ कालु शेख (वय २० वर्षे ), रहिम इस्त्राईल शेख (वय २९ वर्षे), हैतुल अली अकुमुद्दीम शेख (वय ३२ वर्षे), असीम बबलु शेख (२१ वर्षे), रेजाऊल अफजल शेख (वय २५ वर्षे),समजाद अजहर शेख (वय ४६ वर्षे,सर्व रा. टेंभुर्णी,ता.माढा,जि.सोलापूर) मूळ रा.झारखंड या सात जणांना दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. तर दोन्ही दाखल गुन्ह्यातील फायबर बोट मालक महादेव व्यवहारे रा. माळवाडी नं.२ व युवा फलफले रा. गलांडवाडी नं.१ (ता. इंदापुर) हे फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी १५ लाख रुपये किंमतीच्या दोन फायबर यांत्रिक बोटी, प्रत्येकी ५ लाख रुपये किंमतीच्या दोन सक्शन बोटी व २ लाख ४० हजार रुपये किंमतीची २४ ब्रास वाळू असा एकूण ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांच्यावर भा.द.वि.कलम ४३९,३७९,३४ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ९,१५ सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम ३, ४ सह गौण खनिज कायदा कलम ३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, पोलिस कर्मचारी सलमान खान, सहाय्यक फौजदार युवराज कदम, लक्ष्मण सूर्यवंशी, गजानन वानोळे, विक्रम जमादार, विठ्ठल नलवडे यांनी केली.