इंदापूर – महान्यूज लाईव्ह
सध्या राज्य परीक्षा परीषदेची उपायुक्त असलेली व मूळची इंदापूर तालुक्यातील अकोले येथील शैलजा दराडे हिने ऑगस्ट २०२० मध्ये आपला भाऊ दादासाहेब याच्याशी आपले कोणतेही संबंध नाहीत, त्यामुळे त्याच्याशी व्यवहार करू नयेत अशी नोटीस दिली खरी, मात्र दादासाहेब रामचंद्र दराडे याने ४५ जणांची ५ कोटींची फसवणूक केल्यानंतर आता पोलिसांनी शैलजा हिच्यासह दादासाहेब दराडे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दादासाहेब दराडे याने त्याची बहिण शैलजा दराडे (सध्या शैलजा उत्तम खाडे) शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी असल्याचे सांगून ही ४५ जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार हडपसर पोलिसांपुढे आला. सांगली जिल्ह्यातील शिक्षकाने आपल्या दोन भावजयींना शिक्षक पदावर नोकरी लावण्यासाठी दादासाहेब दराडे याला २७ लाख रुपये जून २०१९ मध्ये दिल्याचा हा प्रकार आहे.
सांगली जिल्ह्यातील या तक्रारदाराने दोन भावजयींना शिक्षक पदावर लावण्याच्या अमिषाखाली दादासाहेब याने २७ लाख रुपये घेतल्यानंतर आजपर्यंत ते नोकरी मिळेल या आशेने दादासाहेब याला संपर्क साधत होते. मात्र दादासाहेब हा उडवाउडवीची उत्तरे देत होता. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एस.एम. थोरबोले करीत आहेत.
दरम्यान अशाच प्रकारे ४४ जणांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या नजरेस आले. दरम्यान शैलजा यांनी ऑगस्ट २०२० मध्येच दादासाहेब हा भाऊ असला तरी या नात्याने कोणीही त्याच्याशी कसलाही व्यवहार करू नये अशी नोटीस जाहीर केली होती. हा प्रकार समजल्यानंतर आपण भावाशी सर्व संबंध तोडले होते असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या प्रकारानंतरही शैलजा यांचे नाव यामध्ये घेऊनच हे पैसे घेतले असल्याचे तक्रारदार सांगत असल्याने पोलिसांनी शैलजा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.