मंगळवेढा – महान्यूज लाईव्ह
मंगळवारी मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर गावात बाळू माळींच्या २५ वर्षीय सून व दोन मुलींचा जीव घेणाऱ्या समाधान लोहार याच्याविषयी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जनसामान्यांमध्ये चीड व संताप आहे. स्वभावाने मवाळ असलेल्या माळी कुटुंबात आई गेल्याने अगोदरच दुःखाचा डोंगर असताना एकाच वेळी तीन जणींचे जीव समाधान लोहारने घेऊन संपूर्ण वातावरणच अस्वस्थ करून टाकले.
पोलिसांनी समाधान लोहार या खुन्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे कसून तपास केला, तेव्हा शेताच्या बांधावरील लिंबाची झाडे या वादाला कारणीभूत असल्याचा शोध लागला. मात्र गावकरी त्याच दिवशी समाधान याने दिपाली माळी या विवाहितेची छेड काढत तिचा विनयभंग केला असावा, त्यातूनच हे हत्याकांडाला निमित्त मिळाले असावे असेही बोलत आहेत. पोलिस या नेमक्या कारणापर्यंत पोचतीलही, मात्र माळी कुटुंबावर हा झालेला आघात सामाजिकदृष्ट्या किती विषण्ण करणारा आहे याची कल्पना प्रत्येकालाच आली असेल.
मंगळवारी नंदेश्वर गावात घडलेल्या घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. नंदेश्वर गावातील लवटेवस्ती येथील महादेव माळी यांच्या आईचे निधन झाल्याने त्यांच्या दोन बहिणी संगीता माळी व पारुबाई माळी या घरी आल्या होत्या. महादेव माळी यांना बाळू व दत्ता अशी दोन मुले आहेत. बाळूचा विवाह दिपाली माळी हिच्याशी झाला असून त्याला ४ वर्षांचा रुद्र नावाचा मुलगा आहे.
आईचे निधन झाल्याने माळी कुटुंब दुःखात होते. तेराव्या विधीसाठी घरी थांबलेल्या दोन मुलींनाही यात जीव गमवावा लागला. याच दिवशी खुन्याने डाव साधला. महादेव व लहान मुलगा दत्तू हे दोघे त्यांच्या हॉटेलमध्ये गेले असल्याने व बाळू हा कपड्याच्या दुकानात गेल्याचे पाहून त्याने कुदळ व दगडाने तिघींना ठेचून मारले. दिपाली माळी(वय २१) ,पारूबाई माळी (वय ६०), संगीता माळी (वय ५५) अशी हत्या झालेल्या महिलांची नावे आहेत.
विशेष म्हणजे आईला मारल्यानंतर तिचा ४ वर्षाचा मुलगा रुद्र देखील घरातच होता, मात्र तो या घटनेनंतर अजिबातच बाहेर आला नाही, उलट त्याने दरवाजा कडी लावून बंद केला. जेव्हा त्याचा वडील बाळू माळी घरी आला, त्यानंतरच त्याने दरवाजा उघडला.
२८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत असलेला समाधान लोहार हा विक्षिप्त स्वभावाचा असून तो अविवाहित असल्याने गावातही चिडचीड करायचा अशी माहिती गावकरी देतात. अर्थात माळी यांना दहा एकर तर लोहार याला पाच एकर शेती असून ती शेजारीशेजारी आहे. चार वर्षापूर्वी या शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडावरून झालेला वाद गावकऱ्यांनी मिटवला होता.