सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – संत निरंकारी मिशनमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरु सुदीक्षा महाराज व निरंकारी राजपिता यांच्या पावन सान्निध्यात रविवारी (ता. २६) अमृत परियोजनोंतर्गत स्वच्छ जल – स्वच्छ मन अभियान सुरू केले जाणार आहे.
या मोहिमेंतर्गत संत निरंकारी मिशन सातारा झोन मधील त्रिवेणी घाट- नीरा नरसिंहपूर, संगम माहुली – सातारा, प्रिती संगम – कराड, गणपती घाट- वाई इत्यादी परिसरात साफसफाई करण्यात येणार असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
बाबा हरदेवसिंह यांनी आपल्या कार्यकालात समाज कल्याणाचे अनेक उपक्रम राबवले. त्यामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान प्रमुख बाबी होत्या. त्यातूनच प्रेरणा घेऊन सुदिक्षाजी यांनी यावर्षी अमृत परियोजना मोहिम आयोजित केली आहे.
संत निरंकारी मिशनचे सचिव जोगिन्दर सुखीजा यांनी या मोहिमेविषयी अधिक माहिती दिली. ही मोहिम संपूर्ण भारतभरात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये जवळपास १००० ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार द्वीप समूह, आसाम, बिहार, चंदीगड, छत्तीसगड, दीव दमन, दिल्ली, गुजरात, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडु, तेलंगाना, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल इत्यादींचा समावेश आहे.
दीड लाख स्वयंसेवक सहभागी
या परियोजनेअंतर्गत निरंकारी मिशनचे सुमारे दीड लाख स्वयंसेवक समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहीरी, झरे, पाण्याच्या टाक्या, नाले आणि जलप्रवाह इत्यादिंची स्वच्छता करुन ते निर्मळ बनवतील व जल संरक्षणाची सुरवात करतील. मिशनच्या जवळ जवळ सर्व शाखा यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती या सूत्रांनी दिली.