विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामती – खासदार सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून त्यांचा गाव भेट दौरा सुरू आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार सुप्रिया सुळे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आला. त्या पोस्टर बाबतीत बोलताना त्यांनी मी एक महिला आहे आणि माझा फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही. याची चौकशी मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी करावी. उद्या तुमच्या कुटुंबातील पत्नी, मुलीचा असा फोटो लागला तर तुम्हाला चालेल का?असा प्रश्नही सुप्रिया सुळे यांनी केला.
मध्यंतरी जयंत पाटील यांचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले होते. अजित पवार यांचेही पोस्टर लावण्यात आला होता. आता माझे पोस्टर लावण्यात आले आहे. पोस्टरवर कोणाचेच नाव नसल्याने पोलिसांनी हा विषय गांभिर्याने घ्यावा. असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विरोधी पक्षनेते अजित पवार व माझे फोटो असलेले पोस्टर यापूर्वी लावण्यात आले होते. यामुळे अजितदादाचा आणि माझे फोटो कोण लावतंय? त्याच्या मागे कोण आहे? हे पोस्टर पहाटेच का लावले जात आहेत. याची चौकशी झाली पाहिजे. त्यातून आमचे खासगी आयुष्य, सुरक्षितता याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. हा राजकीय विषय नाही. पण याचा पोलिसांनी गांभिर्याने विचार करत संबंधिताचा शोध घ्यावा. मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.