सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : राजकीय दृष्ट्या विशेष महत्व प्राप्त झालेल्या बोरी गावात उद्या राजकारण ढवळून निघणार आहे. कारण गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याचे भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. बोरी येथे उद्या शुक्रवारी (दि.24) सायंकाळी 5 वा. भाजप नेते हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.
या भाजप पक्षप्रवेशाकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष केंद्रित झाले आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे बोरी गावात दोन महिन्यापूर्वी आले होते, त्याचवेळी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार याचे संकेत मिळाले होते.
ज्येष्ठ नेते कर्मयोगी शंकररावजी पाटील यांना राजकारणात साथ देणारे बोरी गाव आहे. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी मंत्रीपदावर असताना शेततळी उभारणीसाठी व इतर विकास कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून बोरी व परिसराच्या विकासासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे.
आताही राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर असल्याने गावच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही, बोरी गाव विकास कामात अग्रभाग राहील, अशी माहिती भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी दिली.
भाजपच्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्यासह भाजपचे अनेक नेते, तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. भाजप पक्षप्रवेशाच्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन वसुंधरा सोशल फाउंडेशन, जय मल्हार भैरवनाथ परिवर्तन पॅनल व भाजप बोरी यांनी केले आहे.