कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
कोल्हापूर येथील कणेरी मठात आयोजित केल्या जात असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाला गालबोट लागले असून या लोकोत्सवादरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याने ५०हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही गायी अत्यवस्थ आहेत.
या सर्व गायी कणेरी मठाच्याच गोशाळेतील आहेत. काडसिध्देश्वर स्वामींच्या पुढाकारातून येथे पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी व कृषीपूरक ग्रामसंस्कृतीच्या लोकोत्सवाची देशभरात मोठी जाहीरात करण्यात आली होती.
२६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार असलेल्या या उत्सवाला राज्य शासनाने प्रोत्साहित केले आहे. मात्र सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवात शिळे अन्न खायला दिल्याने गोशाळेतील गायींना विषबाधा झाली. त्या तडफडून मरू लागल्याने धावपळ उडाली. त्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी त्या गायींची तपासणी केली. तेव्हा विषबाधा झाल्याचे समोर आले.
कणेरीच्या मठात हजारोंनी गायी आहेत. दरम्यान आतापर्यंत १५ गायींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली असून या जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती फॉरेन्सिक तपासणीनंतरच कळेल असे पशुसंवर्धन खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.