शिरूर : महान्यूज लाईव्ह
दिवसेंदिवस वाढते हृदयरोगाचे प्रमाण चिंताजनक असून नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत श्री गणेशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक डॉ.अखिलेश राजुरकर यांनी व्यक्त केले.
शिरसगाव काटा (ता.शिरूर) येथे शिवजयंती आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पुढे बोलताना डॉ.अखिलेश राजुरकर यांनी सांगितले की, दिवसेंदिवस हृदयरोगाचे प्रमाण वाढत आहे. बदलती जीवनशैली,आहाराच्या चुकीच्या सवयी अतिरिक्त कामाचा ताण यामुळे हृदयरोगाचे रूग्ण वाढत आहे.
हे वाढते प्रमाण पाहता नागरिकांनी नियमित चालण्याचा व्यायाम, आहारात तुपाचे कमी प्रमाण, फास्ट फूड टाळणे, ताण तणाव व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.रक्तदाब,रक्तातील साखरेचे प्रमाण यावर वेळेत तपासणी व हृदयरोगाची समस्या झाल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले तर पुढील धोके टाळता येऊ शकतात.नागरिकांनी येणाऱ्या काळात आरोग्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
यापूर्वी ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त विद्यार्थिनींनी गीते सादर केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल कदम यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. सचिन आवारे यांनी केले तर आभार विजेंद्र गद्रे यांनी मानले.
दरम्यान यानिमित्ताने कोल्हाटी बुवा ग्रामविकास प्रतिष्ठानच्या व रेड प्लस ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य दादासो कोळपे, बाजार समिती सदस्य विजेंद्र गद्रे, घोडगंगा कारखान्याचे संचालक नरेंद्र माने, डॉ.प्रनवकुमार वाघ, भाऊसो रासकर, ग्रा.प सदस्या मनीषा जाधव,माजी पं.स.सदस्य रामभाऊ कदम,विकास जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हाटीबुवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कदम, सचिव जयदीप पवार, पत्रकार सतीश केदारी, गणेश शिंदे, मयूर जगताप,सागर आवारे, समीर चव्हाण, नानासो बोरकर आदींनी परिश्रम घेतले.