पुणे – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही दिवसांपासून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनास भेट दिली. काल रात्री साडेअकरा वाजता मात्र शरद पवार यांनी भेट दिली.. एवढेच नाही, मुख्यमंत्र्यांशी लागलीच चर्चा केली आणि कुलगुरूंनी पाठवलेल्या पत्राचाही दाखला दिला.. विदयार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.. काहींनी ते तसेच सुरू ठेवण्याचा निर्धार केला.. पण काहीतरी तिथे चांगले घडले..
शरद पवार यांची गाडी रात्री साडेअकरा वाजता पुण्यातील आंदोलनस्थळी पोचली. शरद पवार तिथे पोचले. त्यांनी आपण विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य होतील असे सांगितले. त्यानंतर त्यांनी कुलगुरू डॉ. सीजी. पाटील यांनी पाठवलेल्या पत्राची माहिती दिली. कुलगूरूंनी देखील विद्यार्थ्यांचया मागण्या य़ोग्य असल्याचे सांगितल्याचे पवार यावेळी म्हणाले.
त्यानंतर लागलीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत त्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे कुलगुरू, विद्यार्थ्यांचे पाच प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्यानंतर पवार यांनी विद्यार्थ्यांकडे पाच नावे मागितली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी ही पाच नावे सांगितल्यानंतर पवार यांनी सर्वांकडे पाहून ही पाच नावे तुम्हाला सर्वांना मान्य आहेत का असे विचारले. त्यावर सर्वांनी होकार दिला आणि त्यानंतर पवार यांनी हे पाच जण या बैठकीस उपस्थित राहतील, आपण स्वतःही या बैठकीत असू असे सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्यानंतरही काही विद्यार्थी या आंदोलनावर ठाम होते.
मागील चार -पाच दिवसांत अनेक नेतेमंडळी या आंदोलनाकडे फिरकली. आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांशी चर्चा केली, मात्र रात्रीच्या साडेअकरा वाजता पवार यांनी दिलेली भेट ही सर्वार्थाने वेगळी ठरली. वयाच्या ८२ व्या वर्षीही हा राजकीय नेता आपली दखल घेतो आहे, स्वतःहून आपल्या भेटीला येऊन लागलीच मध्यस्थी करतो याचे अप्रूप विद्यार्थ्यांना होते.