शिरूर : महान्यूज लाईव्ह
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या व समाजकार्याला वाहून घेतलेल्या कुटुंबावर शिरूर जवळ भीषण अपघात होऊन एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची वार्ता समजताच संपूर्ण बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
शिरूर जवळ फलकेमळा येथे दुपारी साडेबाराच्या दरम्यान बीड वरून पुण्याकडे जात असताना डोमरी येथील भोंडवे कुटुंबावर काळाचा घाला झाला.वेगात असलेली इंडिका कार कंटेनर वर आदळल्याने गंभीर जखमी होऊन सुदाम भोंडवे,त्यांच्या पत्नी सिंधुताई भोंडवे, स्नुशा कार्तिकी भोंडवे व नात आनंदी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलगा अश्विन हा गंभीर जखमी झाला.
सुदाम भोंडवे हे शिक्षणक्षेत्रात कार्यरत होते.त्यांनी सुमारे ३० वर्षांपासून सोनदरा गुरुकुल नावाने शिक्षण संस्था सुरू केली होती.ते संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत होते. यामध्ये ते अनेकांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत होते. तसेच त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले होते. संपूर्ण कुटुंब हे सुस्वभावी म्हणून परिचित होते.
पुणे अहमदनगर महामार्गावर फलकेमळा येथे दुपारी साडेबाराच्या दरम्यान रत्याच्या कडेला मालवाहू कंटेनर (एम एच.४३ बी. जी.२७७६) हा उभा होता.या उभ्या कंटेनर ला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या इंडिका कार (एम.एच.१२. इ एम २९७८) हीचा क्लिनर बाजूने जोराचा धक्का बसला.
यावेळी कार चालक आश्विन सुदाम भोंडवे(वय.३५, रा. डोमरी, ता. पाटोदा, जिल्हा बीड) यांना गंभीर दुखापत झाली तर कार्तिकी अश्विन भोंडवे (वय.३२), सिंधुबाई सुदाम भोंडवे (वय.६०), सूदाम शंकर भोंडवे (वय.६६) तसेच आनंदी अश्विन भोंडवे (वय.२वर्षे)याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य असून बीडहून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला.अपघाताची तीव्रता इतकी होती कारचा चक्काचूर झाला आहे.
घटनेची माहिती कळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोन्ही वाहने बाजूला घेऊन पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली.घटनेतील जखमींना खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले. उपचार सुरू असताना कार्तिकी व आनंदी यांचा मृत्यू झाला.तर सुदाम भोंडवे व सिंधुताई यांचा जागीच मृत्यू झाला होता.आश्विन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा.उत्तरप्रदेश) यास ताब्यात घेतले आहे. या भयंकर अपघातात एकाच कुटुंबातील सदस्यांच्या झालेल्या मृत्युने व अपघातातील मयत चिमुकलीचा मृतदेह पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
दुपारच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे,पोलिस नाईक विलास आंबेकर, संतोष औटी, ब्रम्हा पवार, विजय सरजिने, हेमंत इनामे, महिला अंमलदार हजारे, पोलिस नाईक चव्हाण, पोलिस हवालदार वैभव मोरे यांसह पोलिस स्टाफने धाव घेत मदतकार्य केले.